Nashik Trimbakeshwer Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या ऑडिटरची पोलिसांत तक्रार, मारहाण केल्याचा आरोप
Nashik Trimbakeshwer Temple : त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या लेखापरीक्षकाला मारहाण केल्याची तक्रार संबंधिताने त्र्यंबकेश्वर पोलिसांत दिली आहे. तर विश्वस्तांनी लेखापरीक्षकावर गंभीर आरोप केले आहेत.
Nashik Trimbakeshwer Temple : त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून येथील लेखापरीक्षकाला मारहाण केल्याची तक्रार संबंधिताने त्र्यंबकेश्वर पोलिसांत दिली आहे. तर दुसरीकडे लेखापरीक्षकाच्या विरोधात उर्वरित विश्वस्तांनी पत्रकार परिषद घेत लेखापरीक्षकावर गंभीर आरोप केले आहेत. यावरून वाद चिघळण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर देशभरात त्र्यंबकेश्वर मंदिर परिचित आहे. यामुळे येथे दररोज हजारो भाविकांची रेलचेल असते. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसर, संत निवृत्तीनाथ मंदिर, कुशावर्त तीर्थ, ब्रह्मगिरी आदी पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते. यातील अनेक भाविक या ठिकाणी पूजाविधी करण्यासाठी येत असतात. या पूजा विधीवरून अनेकदा पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींमध्ये वाद पाहायला मिळाले आहेत.
अशातच आता त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमधील अंतर्गत वाद पुढे आला आहे. देवस्थान ट्रस्ट मध्ये लेखापरीक्षक असलेल्या शुभम मंत्री यांना दोन दिवसांपूर्वी मारहाण करण्यात आल्याची तक्रार त्र्यंबक पोलिसांत दिली आहे. या संदर्भात विश्वस्त मंडळाने पत्रकार परिषद घेत की, गेल्या काही महिन्यांपासून न्यासा संदर्भातील महत्वाची कागदपत्रे न्यासाच्या कार्यालयात नाहीत. तसेच बैठकीच्या इतिवृत्तानुसार विश्वस्तांच्या सह्या नाहीत. न्यासाचे चालू असलेली बांधकामे व त्या अनुषंगाने ठेकेदारांना देण्यात आलेली बिले याबाबतही विश्वस्तांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विशेष लेखा परीक्षक शुभम मंत्री यांच्या खात्यात देवस्थानच्या खात्यातून परस्पर लाखो रुपयांची रक्कम ट्रान्स्फर झाल्याचा संशय विश्वस्तांनी व्यक्त केला आहे.
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त असलेले प्रशांत गायधनी म्हणाले की त्र्यंबकेश्वर मंदिर आवरात भाविकांसाठी मंडप उभारणी करण्याची मागणी केली होती. मात्र आद्यपाही यावर काम सुरू झालेलले नाही. याबाबत लेखा परीक्षक यांच्याशी चर्चेदरम्यान किरकोळ वाद झाला. परंतु देवस्थान मध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या पुढे आल्या. देवस्थानच्या ऑडिटर आम्हीच नेमला आहे, मग आम्ही भ्रष्टाचार केला असता तर ऑडिटर ला का नेमले असते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
तर या प्रकरणावर लेखापरीक्षक शुभम मंत्री म्हणाले कि, देवस्थान ट्रस्ट मधील एका विश्वस्ताने शिवीगाळ करत मारहाणीचा प्रयत्न केला. हि दृश्य मंदिर परिसरात सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. हे फुटेज त्र्यंबकेश्वर पोलिसांनाही दिले असून तशी तक्रार हि दिली आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या कोणत्याही व्यवहारात लेखा परीक्षकांचा कोणताही संबंध येत नसल्याचे ते म्हणाले कि, विश्वस्त मंडळाने ठराव करून माझी नियुक्ती केली आहे, असेही ते यावेळी म्हणाले.