(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Assembly Election 2024: विरोधक ठाम? मराठवाड्यात फेरमतमोजणीसाठी 9 जणांचे अर्ज, पहा संपूर्ण यादी
महायुतीच्या लॅन्डस्लाईड विजयामुळे EVM वर शंका घेत मविआतील नेत्यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज करायला सुरवात केली आहे. मराठवाड्यातून आतापर्यंत फेरमतमोजणीसाठी ९ जणांनी अर्ज केले आहेत
Marashtra Assembly Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना धक्का बसला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून EVMवर शंका घेण्यात येत आहे. मतमोजणीत अनेक ठिकाणी गोंधळ असल्याच्या तक्रारी करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.दरम्यान, EVM मशीन हॅक झाल्याच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण देत EVM हॅकींगवर असणारे सर्व दावे फेटाळून लावत हे दावे बिनबूडाचे आणि निराधार असल्याचे सांगितलं. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल विरोधक मान्य करायला तयार नाहीत. आता बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. दरम्यान, महायुतीच्या लॅन्डस्लाईड विजयामुळे EVM वर शंका घेत मविआतील नेत्यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज करायला सुरवात केली आहे. मराठवाड्यातून आतापर्यंत फेरमतमोजणीसाठी ९ जणांनी अर्ज केले आहेत.यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधून ४, जालना, परभणीमधून प्रत्येकी एक तर धाराशिवमधून ३ उमेदवारांनी पुन:मतमोजणीसाठी अर्ज केले आहेत. कोणत्या उमेदवारांनी केले अर्ज? जाणून घेऊया..
संभाजीनगर मधून 4 जणांनी अर्ज केले आहेत
1-राजू शिंदे-ठाकरे सेना औरंगाबाद पश्चिम
2-बाळासाहेब थोरात ठाकरे सेना औरंगाबाद मध्य
3-नासिर सिद्दीकी एमआयएम औरंगाबाद पूर्व
4-दिनेश परदेशी-ठाकरे सेना वैजापूर
जालना परभणीतून प्रत्येकी 1 अर्ज
राजेश टोपे -(घनसावंगी मतदारसंघ )-राष्ट्रवादी शरद पवार .
परभणी जिल्ह्यातून 1 अर्ज- विजय भांबळे -(राष्ट्रवादी शरद पवार जिंतूर विधानसभा).
धाराशिव मधून 3 अर्ज
1)राहुल मोटे - (परंडा विधानसभा)राष्ट्रवादी शरद पवार.
2)प्रवीण रणबागुल - (परंडा विधानसभा)वंचित ..
3)धीरज पाटील - तुळजापूर विधानसभा-(काँग्रेस)
या जिल्ह्यांमधून एकही अर्ज नाही
फेरमतमोजणीच्या अर्जांमध्ये बीड ,लातूर, नांदेड ,हिंगोली येथून एकही अर्ज नाही.
EVM च्या हॅकींगवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड, रोहित पवार हे ईव्हीएमबाबत अनेक दावे करत आहेत. त्यातच सोशल मीडियावर EVM हॅक होत असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडीओवर नुकतेच निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र निवडणूक आयोगाने याबाबत एक्सवर पोस्ट टाकत स्पष्टीकरण दिले आहे. “व्हिडीओमधील व्यक्ती ईव्हीएम हॅकिंगबाबत निराधार, खोटा आणि बिनबुडाचा दावा करत असल्याचं सांगत EVM हॅक करता येत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. व्हिडीओमधील व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचंही सांगण्यात आलं आहे.