Nashik Corona Update : नाशिकमध्ये कोरोनाची धाकधूक वाढली! एकाच दिवशी कोरोनाचे चौदा रुग्ण, आरोग्य विभाग सतर्क
Nashik Corona Update : गेल्या आठवड्यापासून नाशिक शहरात (Nashik) अचानक कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
Nashik Corona Update : गेल्या आठवड्यापासून नाशिक शहरात (Nashik) अचानक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली असून, त्यातच आज शुक्रवारी एकाच दिवशी चौदा बाधित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेला धडकी भरली आहे. तर नाशिक शहर व ग्रामीण भागातील रुग्णसंख्येने अर्धशतक पार केल्याने नागरिकांचीही धाकधूक वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात एच3 एन2 (H3N2) या नवीन विषाणूने थैमान घातले आहे. त्यातच या रुग्णामधून नव्याने कोरोनाबाधित (Corona Update) रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. आरोग्य विभागाने कोरोनाचे सातत्याने रुग्ण वाढत असताना जोडीला देशपातळीवर घातक मानल्या गेलेल्या एच3 एन2 या नवीन विषाणूचेही दोन रुग्ण आढळल्याने संख्या नऊवर पोहोचली. दरम्यान हवामानातील बदलामुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले, सरकारी आणि खासगी दवाखान्यात गर्दी होऊ लागली तर काही रुग्णांना कोरोना सदृश लक्षणे जाणवू लागल्याने त्यांचे नमुने घेतले असता, त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरोग्य विभागाने सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे दररोज सहा ते दहा बाधित रुग्ण सापडू लागले आहेत. मात्र यातील एक रुग्णाचा अपवाद वगळता इतर सर्व रुग्णांना सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. ते घरातच विलगीकरणात उपचार घेत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. कोरोनाचे संकट घोंगावत असतानाच देशपातळीवर भीती निर्माण करणाऱ्या एच3 एन2 या नवीन विषाणूने बाधा झालेले चार रुग्णही शहरात आढळले आहेत.
दरम्यान एच3 एन2 हा नवीन विषाणूदेखील हवेतून संसर्ग फैलावत असल्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. नाशिक शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. गुरुवारी एकाच दिवसात अकरा तर गेल्या सोमवारी एकाच दिवसात बारा रुग्ण आढळले. तर आज शुक्रवार रोजी एकूण 14 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक शहरात रुग्णांच्या प्रमाणात होत असलेल्या वाढीमुळे नागरिकामध्येही धास्ती वाढली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागात सहा रुग्ण सापडले आहेत. शहरापेक्षा ग्रामीण भागात कमी रुग्ण आहेत. गेल्या चार पाच दिवसांतच जिल्ह्यात कार 50 च्या वर कोरोना बाधितांची संख्या च्या पुढे गेली आहे.
एच3 एन2 च्या विषाणूची भर
कोरोना बरोबरच एच3 एन2 या नवीन संसर्गित विषाणूचे ही रुग्ण शहरात सापडले आहेत. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नमूने तपासासाठी पाठवले असता, आतापर्यंत नऊ रुग्णामध्ये त्याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील सात रुग्ण उपचाराअंती घरी गेले असून, दोन रुग्णावर उपचार केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी तोंडावर मास्क लावावे, सुरक्षित अंतर ठेवावे व हात स्वच्छ धुवावेत, गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.