Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: अमळनेर येथे होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड
97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली.
Ravindra Shobhane: मराठी कथाकार, कादंबरी लेखक आणि समीक्षक रवींद्र शोभणे अमळनेर येथे होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये पुढील वर्षी 2 ते 4 फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. पुण्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेत महामंडळाच्या सर्व घटक आणि संलग्न संस्थांची बैठक झाली. यावेळी महामंडळाच्या कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, उपाध्यक्ष रमेश वंसकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आदी उपस्थित होते.
कोण आहेत रवींद्र शोभणे?
मराठी कथाकार, कादंबरी लेखक आणि समीक्षक रवींद्र शोभणे हे मूळचे उपराजधानी नागपूरमधील आहेत. नागपूरमधील नरखेड तालुक्यातील खरसोली गावामध्ये 15 मे 1959 रोजी त्यांचा जन्म झाला. या ठिकाणी त्यांनी आदर्श विद्यालयातून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण त्यानी मॉरिस महाविद्यालयातून पूर्ण केले. 1989 मध्ये त्यांनी पीएच.डी. प्राप्त केली. त्यांचा पहिला वर्तमान हा कथासंग्रह 1991 मध्ये प्रकाशित झाला होता.
डॉ. शोभणे यांना साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती 1994 साली प्राप्त झाली होती. मराठी भाषा साहित्य अकादमीमध्ये सल्लागार सदस्य म्हणून 2007 ते 2012 यादरम्यान ते कार्यरत होते. डॉ. रवींद्र शोभणे यांना त्यांच्या साहित्यसंपदेमुळे अनेक प्रकारचे सन्मान प्राप्त झाले आहेत. 2003 मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे भरलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
आजवर अनेक मानसन्मान
रवींद्र शोभणे यांना आजवर अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत. यामध्ये 1994 मध्ये साहित्य अकादमीचे प्रवासवृत्ती, नरखेड भूषण पुरस्कार 2005, सल्लागार सदस्य-साहित्य अकादमी दिल्ली मराठी भाषा (2008 ते 2012) सदस्य - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ (2018 ते 12) आमंत्रक साहित्य संमेलन समिती विदर्भ साहित्य संघ (2007 ते 2026) विदर्भ पातळीवर एकूण 14 साहित्य संमेलनाचे आयोजन केलं आहे. सदस्य- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ असे सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत त्यांनी साधारण दहा तीनशेहून अधिक वाड्मयीन, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमातून वक्ते, प्रमुख पाहुणे, अध्यक्ष म्हणून सहभाग नोंदवला आहे.
आजीवन सदस्य
विदर्भ साहित्य संघ नागपूर, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई, आणि मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई यांचे ते आजीवन सदस्य आहेत.
विविध संमेलनांचे अध्यक्ष
विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे, ते 2003 साली पार पडले होते. जळगावमधील पाचव्या सूर्योदय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. अंबाजोगाईमध्ये 2010 मध्ये झालेल्या बाराव्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 2011 मधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 22 व्या मराठी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे. अमरावतीमधील 2017 मधील अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद तसेच 2020 मध्ये चंद्रपूरमध्ये झालेल्या राज्यस्तरीय साहित्य आणि संस्कृती महोत्सवाचे अध्यक्षपद भूषवले होते.
रवींद्र शोभणे यांची प्रकाशित झालेली पुस्तके
- अनंत जन्मांची गोष्ट (अनुवादित, मूळ हिंदी लेखक - विश्वनाथ प्रसाद तिवारी)
- अदृष्टाच्या वाटा (कथासंग्रह)
- अश्वमेध (कादंबरी, पडघम कादंबरीचा पुढचा भाग)
- उत्तरायण (महाभारताची मानवीय पातळीवर मांडणी करणारी कादंबरी)
- ऐशा चौफेर टापूत (आत्मकथन)
- ओल्या पापाचे फुत्कार (कथासंग्रह)
- कादंबरीकार श्री.ना. पेंडसे (समीक्षाग्रंथ)
- कोंडी (कादंबरी)
- गोत्र
- चंद्रोत्सव (कथासंग्रह)
- चिरेबंद
- जागतिकीकरण समाज आणि मराठी साहित्य (साहित्य आणि समीक्षा)
- तद्भव (कादंबरी)
- त्रिमिती (साहित्य आणि समीक्षा)
- दाही दिशा (कथासंग्रह)
- पडघम (कादंबरी)
- पांढर (कादंबरी)
- पांढरे हत्ती
- प्रवाह (कादंबरी)
- मराठी कविता : परंपरा आणि दर्शन (संपादित)
- मराठी कादंबरी परंपरा आणि चिकित्सा (साहित्य आणि समीक्षा)
- महत्तम साधारण विभाजक (कादंबरी)
- महाभारत आणि मराठी कादंबरी
- महाभारताचा मूल्यवेध
- रक्तध्रुव (कादंबरी)
- वर्तमान (कथासंग्रह)
- शहामृग (कथासंग्रह)
- सत्त्वशोधाच्या दिशा (कादंबरी)
- संदर्भासह (साहित्य आणि समीक्षा)
- सव्वीस दिवस (कादंबरी)
- 'उत्तरायण'साठी महाराष्ट्र फाऊंडेशन(अमेरिका)चा पुरस्कार
- 'उत्तरायण'साठी मारवाडी प्रतिष्ठानचा घनश्यामदास सराफ पुरस्कार
- 'उत्तरायण'साठी विदर्भ साहित्य संघाचा पु.य. देशपांडे कादंबरी पुरस्कार
- सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
इतर महत्वाच्या बातम्या