Hanuman Birth Place Controversy : इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव म्हणजेच किष्किंधा नगरी, शासन दरबारी नोंद, साधू महंतांचा दावा
Hanuman Birth Place Controversy : नाशिक जिल्ह्यातील कुशेगाव हे किष्किंदा नगरी असल्याचा दावा करत शासन दप्तरी, जिल्हा नियोजन समितीवर ही परिसराची अशीच नोंद असल्याची माहिती साधु महंतांनी दिली आहे.
Hanuman Birth Place Controversy : गेल्या चार पाच दिवसांपासून सुरू असलेल्या हनुमान जन्मस्थळा बाबत नवा दावा साधु महंतांनी केला आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील कुशेगाव हे किष्किंदा नगरी (Kishkinda Nagri) असल्याचा दावा येथील नागरिकांनी केला आहे. एवढेच नाही तर शासन दप्तरी, जिल्हा नियोजन समितीवर ही परिसराची किष्किंदा नगरी अशीच नोंद असल्याची माहिती येथील जाणकारांनी दिली आहे.
ज्ञानवापी नंतर आता नाशिक जिल्ह्यातील हनुमान जन्मस्थळाचा वाद पुढे आला असून यामुळे अंजनेरीचे (Anjneri) ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. कर्नाटक येथील किष्किंदा नगरीचे गोविदानंद महाराज हे त्र्यंबकेश्वरात ठाण मांडून बसले आहेत. त्यांनी अंजनेरी हनुमान जन्मस्थळ नसल्याचा दावा केल्यानंतर हा वाद सुरु झाला. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर-नाशिक (Trimbaekshwer) येथील साधू महंतांनी याबाबत बैठक घेतली. स्थानिक ग्रामस्थ आणि साधू महंतांच्या बैठकींनंतर अंजनेरी हे जन्मस्थळ असून इगतपुरीतील कुशेगाव हे किष्किंदा नगरी असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोमेश्वरानंद सरस्वतींचा दावा
नाशिक पासून फक्त 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुशेगाव गावात किष्किंधा नगरी म्हणून धार्मिक स्थळ आहे. त्र्यंबकेश्वर पासून काही अंतरावर वसलेले आहे. पुरातन काळापासून येथील नागरिक या भागाला किष्किंदा नगरी म्हणूनच ओळखतात. किष्किंदा नगरी अजनेंरी पर्वताच्या मागील बाजूस म्हणजे अंजनेरी पर्वताला लागूनच हा दुसरा पर्वत आहे. इथेच सुग्रीवाचे राज्य होते, याच पर्वताच्या पायथ्याशी हनुमान आणि राम लक्ष्मण यांची भेट झाली. त्यावेळी हनुमानाने राम लक्ष्मणाला खांद्यावर बसवून पर्वतावर घेऊन गेले होते. हे तेच ठिकाण असल्याचा दावा केला जातोय.
तर किष्किंदा नगरीचे सेवेकरी असलेल्या महंत योगी शिवनाथ महाराज म्हणाले कि, गेल्या अनेक वर्षांची कुशेगावची आख्यायिका असून या ठिकाणी प्रभू रामचंद्र व सुग्रीव यांची भेट झाली असून त्यांनी या ठिकाणी बाण मारून पंपासरोवराची निर्मिती देखील केली आहे. आजपर्यंत या तीर्थाचे पाणी कधीच कमी होत नसून या तीर्थाची नोंद आख्यायिका रामायणात देखील आहे. त्यामुळे या किष्किंधा नगरीवर कोणी अन्याय करू नये व राज्य सरकारने येथे लक्ष देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
कुशेगाव हीच किष्किंधा नगरी असून हे स्थळ वनविभागाच्या हद्दीत असल्यामुळे येथे अडचणी निर्माण होतात. मात्र तरी देखील आम्ही 'क' वर्गात मंजुरी दिली आहे. या ठिकाणी स्थानिक निधीतून विकासकामे केली आहे. विशेष म्हणजे शासन दप्तरी, जिल्हा नियोजन समितीवर ही या परिसराची किष्किंदा नगरी अशीच नोंद आहे. या परिसराच्या विकासासाठी वन विभागाककडे अडीच एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. तिर्थस्थळाचे पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती सदस्य जिल्हा नियोजन समितीच्या गोरख बोडके यांनी दिली.
सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी म्हणाले कि, केवळ आख्यायिका किंवा भावनांच्या आधारे नाही तर अधिकृत शासकीय नोंदीद्वारे अंजनेरी हेच श्री हनुमानाचे जन्मस्थान असल्याचा पुरावा मी सादर करण्यास तयार आहे. सरकारी पुराव्यानिशी मी सिद्ध करून दाखवतो की, अंजनेरीच हनुमानाचे जन्मस्थान. किष्किंदा नव्हे. नाशिककरांना शास्त्रार्थसाठी खुले आव्हान देणाऱ्या साधू महाराजांचे आव्हान मी नाशिककर या नात्याने जाहीररीत्या स्वीकारतो असेही ते म्हणाले.
काय सांगतेय आख्यायिका?
कुशेगाव येथे किष्किंधा नगरी आहे. या ठिकाणी वाल्मिकी रामायणाच्या इतिहासाप्रमाणे प्रभू रामचंद्र सुग्रीव यांची भेट झाल्याची आख्यायिका असुन शबरी मातेचे या ठिकाणी मंदिर आहे. तसेच या ठिकाणी सुग्रीव राजा होता, त्यांची भेट हनुमंतराय यांनी करून दिल्याची आख्यायिका आहे. विशेष म्हणजे येथे पंपासरोवर म्हणून प्रसिद्ध आहे. ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने बाण मारून तीर्थाची निर्मिती केली असून या सरोवराचे पाणी किती ही उपसले तरी कमी होत नाही. तसेच गावातील जुने जाणते नागरिक देखील किष्किंधा नगरी म्हणूनच आपल्या गावाची ओळख करून देतात.