Nashik Rain : जिल्ह्यात मागील 24 तासांत 1619 मिलीमीटर पाऊस, नाशिक शहरात पावसाची संततधार
Nashik Rain : नाशिक (Nashik) जिल्ह्यात मागील 24 तासात तब्बल 1619 मिलिमीटर पावसाची (Heavy Rain) नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत सरासरीच्या 155 टक्के पाऊस जास्त झाला आहे.
Nashik Rain : मागील चार दिवसांपासून सुरू असलेला पाऊस अद्यापही कायम आहे. तर मागील 24 तासात जिल्ह्यात तब्बल 1619 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेला पाऊस शहरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी जिल्ह्यात मात्र अद्यापही पावसाची संततधार सुरूच आहे.
मागील 24 तासात जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पेठ तालुक्यात 328 तर सुरगाणात 289 मिलिमीटर पावसाने नोंद करण्यात आली तर इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी राहिला असला तरी आजही या तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. तर दिंडोरीत 172 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान यंदाच्या हंगामात आत्तापर्यंत सरासरीच्या 155 टक्के पाऊस जास्त झाला आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी पावसाचा जोर काही भागात कमी झाला असला तरी अधून मधून तो कोसळत आहे. पावसाने अनेक भागात दाणादाण उडवली असून यंदा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागली. अनेक भागात पाणीटंचाईचे सावट उभे टाकले होते. पेरण्यांची कामे देखील रखडली होती. तथापि गेल्या दोन तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने हे चित्र पालटले आहे. मुसळधार पावसाने सर्वत्र पूरस्थितीलाच तोंड द्यावे लागत आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाचे कमी अधिक प्रमाणात आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 1500 हून अधिक मिलिमीटर पाऊस झाला आहे. पेठ, सुरगाणा आणि दिंडोरीत पावसाने दाणादाण उडवली असून लहान मोठ्या नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. तर काही ठिकाणी रस्ते आणि पूल पाण्याखाली गेल्यामुळे संबंधित मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली.
असा झाला पाऊस
दरम्यान आदल्या दिवशीच्या तुलने त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीत पावसाची तीव्रता काहीशी कमी झाली. या ठिकाणी अनुक्रमे 131 व 90 मिलिमीटर पाऊस झाला तर कळवण 139, चांदवड 78, निफाड 76, नाशिक 70, बागलाण 69, देवळा 73, येवला 41 मिलिमीटर पाऊस झाला. तुलनेत मालेगाव 37 सिन्नर 24 नांदगाव 22 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यात पुराचे 7 बळी
जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाने चांगलीच दाणादाण उडवली आहे. त्यातच नद्या-नाल्यांना आलेल्या पुरात मंगळवारी अजून 5 जण वाहून गेले. जिल्ह्यात दोन दिवसांत 7 जण पावसात वाहून गेल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. तसेच दोन गाय, एक म्हैस व बैल दगावला. पूर परिस्थितीमुळे 59 कुटुंबांचे स्थलांतर केले आहे.