(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nandurbar News : लग्न करायचंय, वधू-वराचा वयाचा दाखला ग्रामपंचायतीला दाखवा; नंदुरबारमधील भुजगाव ग्रामपंचायतीचा ठराव
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील भूजगाव ग्रामपंचायतीत वेगवेगळे अभिनव प्रयोग राबविले जात आहेत.
Nandurbar News : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील भूजगाव (Bhujgaon Grampanchayat) ग्रामपंचायतीत वेगवेगळे अभिनव प्रयोग राबविले जात असून आता नव्या प्रयोगामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. येथील महिला ग्रामसभेत बालविवाह प्रतिबंधक अधिनियम लागू करण्याचा ठराव करण्यात आला असून हरणखुरी आणि भुजगाव गाव बालविवाह बंदी (Child Marriage) क्षेत्र घोषित करण्यात आले. याबाबत कुणी ठराव मोडण्याचा प्रयत्न केल्यास कारवाईचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
ग्रामसभा (Gramsabha) म्हटली की, भांडणे आरडा-ओरड पक्के ठरलेलेच त्यामुळे गाव विकासासंदर्भात ग्रामसभा अत्यंत महत्वाची असून देखील नागरिक ग्रामसभेकडे पाठ फिरवतांना दिसतात. ग्रामपंचायत भूजगाव येथे ग्रामसभा झाली असून झालेली ग्रामसभाच सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. ग्रामसभा यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून वेगवेगळे उपाय राबविण्यासंदर्भात ग्रामपंचायतीला सूचना दिल्या जातात. परंतु काही निवडक ग्रामपंचायती वगळता तसे प्रयत्न होताना दिसत नाही. मात्र याला अपवाद ठरली आहे, नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका धडगावातील भुजगाव ग्रामपंचायत. ग्रामसभेकरिता ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात मोकळ्या मैदानात चक्क मंडप लावण्यात आला. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत आवाज पोहचावा. यासाठी माईक आणि स्पीकरची सोय करण्यात आली होती.
तसेच गावकऱ्यांना प्रश्न मांडण्यासाठी स्वतंत्र माईक आणि पिण्याचा पाण्याची सोय उपलब्ध करण्यात आली होती. ग्रामसभेची स्पिकरच्या माध्यमातून माहिती दिली. ग्रामसभेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी झाले पाहिजे, म्हणून ग्रामपंचायत स्तरावरून अजेंडा वितरीत करण्यात आला तसेच गावाच्या व्हाटसअप संदेश पाठविण्यात आले. गावातील प्रत्येक पाड्यातील पाडाविकास कमिटीच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला निरोप दिला गेला. स्वतः सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य ऑटोरिक्षावर लॉडस्पीकरच्या माध्यमातून गावातील प्रत्येक पाड्यापर्यंत जनजागृती केली. रस्त्यावर जो नागरिक भेटेल त्या नागीकांना ग्रामसभेची तारीख वेळ आणि ठिकाणाची माहिती दिली जात होती. ग्रामसभेची वेळेवर माहिती मिळाल्याने मोठ्या संख्येने गावकरी उपस्थिती राहिले.
साधारणत: सहा तास चालेल्या ग्रामसभेत अनेक प्रश्नावर चर्चा करण्यात आले होते. त्यात विविध समित्यांची मंजुरी, वृक्षारोपण, रोजगार, कुपोषण, हातपंप दुरुस्ती जल जीवन मिशन योजनेचे माहिती आणि शासकीय योजनाची माहिती नागरिकांना देण्यात आले. सर्व नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे देण्यात आली होती. कोणत्याही प्रश्नावर चर्चा सुरु असताना वाद विवाद झाला नाही. अत्यंत खेळी-मेळीच्या वातावरणात सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. तालुक्यात काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित राहिले. आदर्श अशी ग्रामसभा झाल्याबाबत तालुका स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.
सरपंच अर्जुन पावरा म्हणाले की, ग्रामसभा ही गाव विकास आराखड्यासाठी अत्यंत महत्वाची असते,परंतु नागरिक ग्रामसभेकडे पाठ फिरवतांना दिसतात, हे गाव विकासासाठी धोक्याचे आहे. गावातील जनतेचा ग्रामसभेत आणि निर्णय प्रक्रियेत सक्रीय सहभाग वाढवा यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून प्रयत्न केले जात आहे, कालच्या ग्रामसभेत अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा झाली. त्यात गावात बालविवाहास पूर्णपणे बंदी एक मताने झालेला ठराव महत्वाचा ठराव ठरला. त्यामुळे गावाचे सामाजिक आरोग्य चांगले राहील.
तर हरणखुरी येथील ग्रामस्थ महिला मोचाडा पावरा म्हणाल्या की, मी अनेक वर्षांपासून ग्रामसभेत सहभागी होत आहे. परंतु ही ग्रामपंचायतीची पहिलीच वेळ ग्रामसभेची माहिती अशी जाहीररित्या जनतेला मिळाली. आजच्या ग्रामसभेत विकासात्मक सकारात्मक आणि सर्व सर्वसमावेशक मुद्यावर शांततेत चर्चा आणि ठराव मंजूर झाले. नवीन निवडून आलेले सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उत्तमरीत्या कारभार करत आहे. उच्च शिक्षित असल्याचा परिपाक आहे असे वाटते.
महिलासभा आणि बालसभेचे आयोजन
शासकीय परिपत्रकाप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामसभा घेण्यापूर्वी बाल सभा घेणे बंधनकारक आहे. त्या अनुषगांने आदल्या दिवशी महिलासभा आणि बालसभाचे आयोजन करण्यात आले. पाडा विकास कमिटीच्या माध्यमातून महिला सभेचे निरोप महिलांना देण्यात आला. मोठ्यासंखेने महिला सभेस उपस्थित राहून चर्चेत सहभागी झाले.
बालविवाह संदर्भात महत्वाचा ठराव
नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे बालविवाह या महत्वाच्या प्रश्नावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली महिला ग्रामसभेत सखोल चर्चा करून बालविवाह प्रतिबंधक अधिनियम लागू करण्याचा ठराव करण्यात आला. हरणखुरी व भुजगाव गाव बालविवाह बंदी क्षेत्र घोषित करण्यात आले. या पुढे बालविवाह झाल्यास बाल प्रतिबंधक अधिनियमान्वये कारवाई केली जाणार. ग्रामसभेत बाल विवाहास बंदीचा ठराव मंजूर करणारी भूजगाव ग्रामपंचायत कदाचित राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरणारी असावी...
असा घेण्यात आला ठराव..
सदर ठरवात ग्रामपंचायत परिक्षेत्रात बालविवाह करण्यास बंदी घालण्यात आली.
ग्रामपंचायत परिक्षेत्रात लग्न पत्रिका छापतांना मुलीचे 18 वर्ष आणि मुलाचे 21 वर्ष पूर्ण झाल्याची नोट लिहिणे बंधनकारक.
लग्नापूर्वी वधू व वराचे वयाचा पुरावा ग्रामपंचायतीला सादर करणे बंधनकारक राहील.
लग्नासाठी वयाचा पुरावा दाखल केल्यानंतर ग्रामपंचायत स्तरावरून ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल.
अल्पवयीन मुला-मुलीनी पळून जाऊन लग्न करण्याचा प्रयत्न केले अश्या बालकाच्या विरोधात गावातील वरिष्ठ नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने कारवाई केली जाणार. बाल विवाह करणे गुन्हा असल्याचा गावाच्या मुख्य चौकात फलक लावण्यात येईल.
गावात ग्रामपंचायत बालविवाह अधिनियमाची जनजागृती करणार...