बापाने दारु सोडावी यासाठी चिमुकल्याने ग्रामसभा गाजवली; ग्रामसभेसमोर बापाला उठाबशांची शिक्षा
यवतमाळमध्ये 13 वर्षीय अंकुश राजू आडे या चिमुकल्याने ग्रामसभेत त्याच्या बापाने दारू सोडावी अशी मागणी केली.
![बापाने दारु सोडावी यासाठी चिमुकल्याने ग्रामसभा गाजवली; ग्रामसभेसमोर बापाला उठाबशांची शिक्षा Yavatmal son demamded in Gram Sabha to get his father to give up alcohol बापाने दारु सोडावी यासाठी चिमुकल्याने ग्रामसभा गाजवली; ग्रामसभेसमोर बापाला उठाबशांची शिक्षा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/10/7a56d3469e19443330dedb01715d45f8_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
यवतमाळ : घरचा कर्ता पुरुष जर दारूच्या आहारी गेला तर त्याचा त्रास कुटुंबातल्या सर्वांनाच होतो. मग त्याने दारू सोडावी यासाठी मोठ्या लोकांकडून अनेक प्रयत्न केले जातात. पण यवतमाळमध्ये एका चिमुकल्याने त्याच्या बापाने दारू सोडावी यासाठी चक्क ग्रामसभेत मागणी केली आणि बापाची दारू सोडवली.
यवतमाळ जिल्ह्याच्या लोनबेहळ येथील 13 वर्षीय अंकुश राजू आडे या चिमुकल्याने दोन दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामसभेत त्याचे वडील राजू आडे यांनी दारू सोडावी यासाठी मागणी केली. त्यानंतर ग्रामसभेने अंकुशच्या बापाला कान पकडून "उठाबशा" काढायचे फर्मान दिले आणि यापुढे कधीही दारू प्यायची नाही असं बजावलं. अंकुशच्या बापानेही ग्रामसभेचा आदेश मानून आपल्या लाडक्या मुलाच्या प्रेमापोटी यापुढे दारू पिणार नाही असे वचन सर्वांसमोर दिलं.
अंकुश राजू आडे हा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातव्या वर्गात शिक्षण घेत असून त्याच्या घरची आर्थिक स्थिती बेताची आहे. त्यात बाप दारू पित असल्याने त्याने स्वतः भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत घरची जबाबदारी स्वीकारली.
अंकुश गावापासून नऊ किलोमीटरवर असलेल्या आर्णी या तालुक्याच्या ठिकाणी सकाळी भाजी मंडीत जाऊन भाजी घेऊन येतो आणि नंतर शाळेत जातो. शाळा सुटल्यावर तो भाजी विक्री करतो. या सर्व बाबींसाठी अंकुशचे सर्वत्र कौतुक होत असल्याने त्याची दखल लोनबेहळ ग्रामपंचायतने घेत त्याचे कौतुक करण्यासाठी ग्रामसभेत बोलविले होते.
ग्रामपंचायत सुरू असताना अंकुश त्याच्या बापासोबत ग्रामपंचायतमध्ये पोहोचला. तिथे राजू आडे नेहमी दारू पितात व त्यांचे व्यसन सोडवावे अशी विनंती त्याने ग्रामसभेला केली. ग्रामसभेने राजू आडे यांना कान धरून उठबशा काढण्याचे व दारू पिणे सोडण्याचा आदेश दिला.
त्या बापानेही शेवटी मुलाच्या प्रेमापोटी उठबशा काढून दारू प्यायचं सोडत असल्याचं वचन ग्रामसभेत सर्वांसमोर दिलं. यामुळे आता अंकुशचे कौतुक होत आहे.
मुलाने आणि गावकऱ्यांनी समजावून सांगितल्याने लोनबेहळच्या ग्रामपंचायत समोर उठाबशा काढून 'मी दारू सोडली' असं अंकुशच्या बापाने सांगितले. आता मुलाला हातभार लावतो, भंगार आणि पपई विक्रीचा व्यवसाय करीत करतो असंही त्याने आश्वासन दिलं.
अंकुशचे सर्वत्र कौतुक
आर्णी तालुक्यातील लोणबेहळ या गावातील अंकुश आडे याचे गावातच पडके घर असून घरात आजी, आजोबा, वडील, आई आणि अंकुश पेक्षा आणखी 2 लहान बहीण भाऊ आहेत. आडे कुटुंबाकडे दोन एकर कोरडवाहू शेती असून शेतात उत्पन्न नसल्यासारखंच आहे. अंकुशचे आजोबा-आजी मजूरी करायचे. आता वाढत्या वयामुळे ते थकले आहेत. अंकुशचे वडील आहे मात्र दारूच्या व्यवसनाने घरी सतत त्याच्या आईशी वाद घालून मारहाण करायचे. आई मजुरीला जाते, मात्र तिचे पैसे वडील घेऊन तिलाच मारहाण करतात. वडिलांच्या दारूच्या व्यसनाने मुलाकडे दुर्लक्ष होऊन घरची आर्थिक परिस्थिती आणखी बेताची झाली. त्यामुळे अंकुशने स्वतःच यातून काही मार्ग काढण्याचा निर्णय घेतला आणि दोन महिन्यापूर्वी गावातील काही लोकांकडून उधार पैसे घेऊन गावात भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्याची भाजी तो हटके स्टाईलने विक्री करतो आणि बोलण्याच्या शैलीने तो हातोहात भाजी विक्री करतोय. या भाजी विक्रीच्या पैशातून तो घरी मदत करतो. शिवाय त्याची लहान बहीण आर्णी येथे पाचव्या वर्गात शिक्षण घेते, तिच्या शिक्षणाची जबाबदारी अंकुशने सांभाळली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)