(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : पीएम मोदींच्या हस्ते रेल्वे स्थानकाचे पुनर्विकास भूमिपूजन; मनमाडसह लासलगाव, नगरसूल, नांदगावचा समावेश
Nashik Railway : नाशिक जिल्ह्यातील चार रेल्वेस्थानकांचा विकास होऊन प्रवाशांना सर्वोत्तम व अत्याधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत.
Nashik Railway Station : देशभरातील 508 आणि महाराष्ट्रातील 44 रेल्वे स्थानकांचा (Hitech Railway Station) विमानतळाच्या धर्तीवर विकास करण्याचा निर्णय केंद्राने (Amrut Bharat) घेतला असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यात नाशिक जिल्ह्यातील चार रेल्वेस्थानकांचा विकास होऊन प्रवाशांना सर्वोत्तम आणि अत्याधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तर भुसावळ विभागातील जवळपास 15 रेल्वेस्टेशनचा यात समावेश असणार आहे.
केंद्र सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाच्या (Railway Ministry) वतीने अमृत भारत स्थानक योजनेतून नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मनमाड रेल्वेस्थानक (Manmad Railway) आधुनिकीकरण रुपये 44.80 कोटी, नगरसुल रेल्वेस्थानक आधुनिकीकरण रुपये 20.03 कोटी, लासलगाव रेल्वेस्थानक आधुनिकीकरण रुपये 10.10 कोटी, नांदगाव रेल्वेस्थानक आधुनिकीकरण रुपये 10.14 कोटी निधी मंजूर करण्यात आला. या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होऊन रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मनमाड, चाळीसगाव, शेगाव, बडनेरा, मलकापूर, नेपानगर या सहा रेल्वे स्थानकांचे आज सकाळी 9 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन झाले. या कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोष यांची उपस्थित राहणार आहे. तसेच मनमाड रेल्वे स्थानकावर या कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे देखील उपस्थित राहणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी होण्यासाठी रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.
काय काय बदल होणार?
रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत स्टेशन योजनेतून देशातील 508 रेल्वेस्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत विविध अद्ययावत सोयी सुविधा प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. स्थानक प्रबंधक ऑफिस, पार्सल ऑफिस, हेल्थ ऑफिस, टीसी ऑफिस, एमसीओ ऑफिस यांचे पूर्णपणे नूतनीकरण केले जाणार आहे. नवीन कोच डिस्प्ले बोर्ड बसवण्यात येणार आहे. विकास कामांमध्ये स्थानकाच्या दर्शनी भागाचा विकास, लँडस्केपिंग, मॉडल टॉयलेट, प्लॅटफॉर्म सरफेस केबल ट्रेज, अत्याधुनिक फर्निचर भरपूर प्रकाश योजनेसाठी एलईडी, नाम फलक, पार्किंग व्यवस्था, प्रतिक्षागृह, स्वच्छतागृह, नवीन फूटओवर ब्रीज, दोन्ही प्लॅटफॉर्मवर लिफ्ट व्यवस्था, नवीन कोच डिस्प्ले, सीसीटीव्ही कॅमेरे आदींचा समावेश असणार आहे.
मनमाड रेल्वे स्थानकाचे मोदींच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन
अमृत भारत योजनेंतर्गत देशभरातील 508 रेल्वे स्थानकाबरोबर देशातील प्रमुख स्थानक असलेल्या मनमाड रेल्वे स्थानकाचा 44.8 कोटी रुपये खर्च करून कायापालट होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अमृत भारत योजनेद्वारे मनमाडसह लासलगाव, नांदगाव रेल्वे स्थानकाचेही रुपडे बदलेल आणि प्रवांशांना अत्याधूनिक सुविधा प्राप्त होणार असल्याचा विश्वास डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :