(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Police : नाशिकमध्ये गुन्हेगारीवर 'अंकुश' लावण्यासाठी 'कोम्बिंग ऑपरेशन', 58 टवाळखोरांवर कारवाई
Nashik Police : नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांचे सत्र सुरुच असल्याने पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
Nashik Police : नाशिक (Nashik) शहरात गेल्या काही दिवसांत खून तसेच गुन्हेगारीच्या (Crime) घटनांचे सत्र सुरू आहे. या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने शहरात शुक्रवारी मध्यरात्री अचानक कोम्बिंग ऑपरेशन (Combing Operation) राबविण्यात आले. त्यावेळी घरात आढळून आलेल्या 11 संशयितांना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली.
गेल्या काही दिवसांपासून शहरात रोजच कुठे खून (Murder) तर कुठे प्राणघातक हल्ला, तर कुठे विनयभंगाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे सराईत गुन्हेगारांसह इतर गुन्हेगारांमध्ये वाढ होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येत आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी, गुन्हेगारांमध्ये 'खाकी'चा जरब निर्माण व्हावा, याउद्देशाने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Nashik CP) यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. या मोहिमेत एकूण 128 सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. तसेच हद्दपार करण्यात आलेल्या 51 संशयितांच्या घरी धडक दिली. त्यावेळी घरात आढळून आलेल्या 11 संशयितांना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली.
नाशिक शहरातील मागील काही दिवसांपासून वाहन चोरी, घरफोडी, मोबाइल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंगसह हाणामाऱ्या, शस्त्राचा धाक दाखवून जबरी लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी बैठक घेत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे ठरविले. त्यानुसार शुक्रवारी रात्री 11 ते मध्यरात्री तीन शहर आयुक्तालयाच्या हद्दीत एकाचवेळी पोलिसांचा फौजफाटा वाहनांसह रस्त्यावर उतरला. संशयित गुन्हेगारांसह सराईत गुन्हेगारांची झाडाझडती पोलिसांनी सुरू केली. या मोहिमेत अनेक संशयितांच्या घरात घुसून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत तीन पोलीस उपायुक्त, सर्व विभागांचे सहायक आयुक्त, 15 पोलीस निरीक्षक, 29 सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, 236 पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला.
64 सराईत गुन्हेगारांना धडा
कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलीस आयुक्तालय हद्दीत एकूण 128 रेकॉर्डवरील गुन्हेगार, हिस्ट्रीशिटर गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. यावेळी 64 संशयितांवर कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्तालय हद्दीतून हद्दपार करण्यात आलेल्या 51 इसमांचा त्यांच्या राहत्या घरी शोध घेतला गेला. यावेळी घरात आश्रय घेताना 11 संशयित हद्दपार व्यक्ती आढळून आले. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तसेच एकूण 58 टवाळखोर इसमांवर महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.
पोलिसांकडून झडती
नाशिक पोलिसांकडून शहरातील आडगाव, म्हसरुळ, पंचवटी, मुंबईनाका, सरकारवाडा, गंगापूर, सातपूर, अंबड, इंदिरानगर नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत फुलेनगर, पंचवटी नाशिक, नीलगिरीबाग, नांदूरनाका, अश्वमेध नगर, शांती नगर, मखमलाबाद आदी परिसरात झाडाझडतीची मोहीम राबविली गेली.