(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Police : नाशिक पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन, गुन्हेगारांना तंबी
Nashik Police : वाढत्या गुन्हेगारीवर (Crime) अंकुश ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांकडून (Nashik Police) कोम्बिंग ऑपरेशन (Combing Operation) राबविण्यात आले. दहा गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.
Nashik Police : नाशिक शहरात गेल्या काही दिवसांत खून तसेच गुन्हेगारीच्या घटनांचे सत्र सुरु आहे. या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने शहरात रविवारी मध्यरात्री अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हेगारांच्या तपासासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये 03 तडीपार गुन्हेगारांना अटक करण्यात आले. तसेच 10 गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्यासह 21 अधिकारी व 110 कर्मचारी सहभागी झाले होते. वाढलेल्या गुन्हेगारी घटना नियंत्रित करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहे.
दरम्यान मागील काही दिवसांत नाशिक शहरासह जिल्ह्यांत सहा ते सात खुनाच्या घटना उघडकीस आल्याने जिल्हा हादरला आहे. तर घरफोडी, मारहाण आदी घटना सातत्याने घडत आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पंचवटी, म्हसरूळ आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री 1 ते पहाटे 4 या वेळेत अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईत शहर व जिल्ह्यातील 21 तडीपार चेक करण्यात आले. यात 3 तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांना अटक करण्यात आले. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.
तसेच रात्रीच्या सुमारास संशयास्पद फिरणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. वाहनांत अवैध शस्त्रे आहेत का? याची तपासणी करण्यात आली. गुन्ह्यात संशयित असलेल्या 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या मोहिमेत उपायुक्त संजय बारकुंड, सहाय्यक आयुक्त वसंत मोरे, गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह 21 अधिकारी, 110 कर्मचारी, दंगा नियंत्रण पथक व जलद प्रतिसाद पथक सहभागी झाले होते.
कोम्बिंग ऑपरेशनचे सातत्य
एकीकडे शहरासह जिल्ह्यात गुन्हे वाढत असून यासाठी नाशिक पोलीस आणि ग्रामीण पोलिसांच्या समन्वयातून योग्य त्या उपाययोजना आवश्यक आहेत. गुन्हेगारांवर अंकुश अशा पद्धतीचे कोम्बिंग ऑपरेशन वेळोवेळी राबविण्यात येऊन त्या त्या ठिकाणच्या पोलीस स्टशांमधून संबंधित गुन्हेगारांना सुधार योजनेच्या माध्यमातून गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर काढणे महत्वाचे आहे. जेणेकरून शहरात व जिल्ह्यात गुन्हे कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे सात्यत्याने पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन होणे आवश्यक आहे.
तडीपार गुन्हेगार नाशकात अनेकदा इतर राज्यातील, शहरातील गुन्हेगार गुन्हे करून नाशिकमध्ये वास्तव्य करत असल्याचे समोर आले आहे. यामुळे स्थानिक गुन्हेगारांना साथ मिळून गुन्हे करण्यास मदत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अनेकदा शहरातील घर मालक तपास न करता अनोळखी नागरिकांनी घर देतात. या संदर्भातील माहिती ठेवणं भविष्याच्या दृष्टीने महत्वाचे असताना असे होत नाही. मग अशावेळी गुन्हा करायचा आणि आपल्या राज्यात पळून जायचं अशी पद्धत वापरून अनेक गुन्हेगार नाशिकमध्ये वास्तव्य करतात.