Girish Mahajan : नाशिकमध्ये भाजपला बंडखोरीचे ग्रहण, 'डॅमेज कंट्रोल’साठी संकटमोचक गिरीश महाजन मैदानात, बंडोबांना थंड करण्याचं आव्हान
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिक शहरात भाजपमधून तिकीट न मिळालेल्या इच्छुकांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी आता संकटमोचक गिरीश महाजन यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडत असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. तर नाशिक शहरात भाजपमधून (BJP) तिकीट न मिळालेल्या इच्छुकांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी आता भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन नाराज नेत्यांच्या मनधरणीसाठी स्वतः मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातील इच्छुकांची गिरीश महाजन यांच्याकडून नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मत विभाजन आणि नाराजी नाट्याचा फटका बसू नये, यासाठी भाजपकडून खबरदारी घेतली जात आहे. भाजपतील अंतर्गत गटबाजी मिटवल्यानंतर गिरीश महाजन मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांची मनधरणी करणार आहेत.
नाशिकमध्ये भाजपला बंडखोरीचे ग्रहण
नाशिक शहरातील नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व आणि मध्य या मतदारसंघात बंडखोरीने भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. नाशिक पश्चिममध्ये सीमा हिरे यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये यासाठी शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या भाजप पक्षातील इच्छुकांनी थेट बंडाचे हत्यार उपसले आहे. भाजपचे दिनकर पाटील यांनी मनसेत प्रवेश केला. मनसेकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर नाशिक पूर्व मध्ये राहुल ढिकले यांच्यासमोर गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय समजले जाणारे गणेश गीते यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. शरद पवार गटाकडून गणेश गीते यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात देवयानी फरांदे यांना तिकीट मिळाल्यानंतर नाराजी सुरु दिसून आला आहे.
गिरीश महाजन डॅमेज कंट्रोल’ करण्यात यशस्वी होणार का?
यामुळे मतविभाजन आणि नाराजीमुळे भाजपच्या उमेदवारांना फटका बसू नये यासाठी गिरीश महाजन हे नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. महायुतीतील मित्रपक्ष आणि भाजपमधील नाराज नेत्यांना महायुतीचा धर्म पाळण्यासाठी गिरीश महाजन हे बैठकांचे सत्र घेत आहेत. गिरीश महाजन यांना नाशिक शहरातील तीनही जागा राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे सध्या तरी पाहायला मिळत आहे. आता गिरीश महाजन नाशिकमधील 'डॅमेज कंट्रोल’ करण्यात यशस्वी होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार