Nashik Rain : नाशिकमधील सिन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतीचं मोठं नुकसान, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
नाशिक (Nashik) जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे.
Nashik Rain : नाशिक (Nashik) जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. तसेच बाजारपेठांमध्ये देखील पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कलीत झालं आहे. तसेच काही ठिकाणी काही नागरिक पाण्यात अडकल्यानं पोलीस आणि जिल्हा प्रशासनानं रेस्क्यू ऑपरेशन राबवून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. दरम्यान, या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
गोदावरी नदीची पूरस्स्थती कायम
राज्याच्या काही भागात पुन्हा पावसानं जोर धरला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. रात्री देखील नाशिकमध्ये तुफान पावसानं हजेरी लावली यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिन्नर तालुक्यात तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. तेथील रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आलं आहे. तर बाजारपठेमध्ये पाणी शिरले आहे. तसेच यामुळं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळं नाशिकच्या गोदावरी नदीची पूरस्स्थती कायम आहे. गोदावरी नदीच्या काठावरील मंदिर सलग तिसऱ्या दिवशी पाण्याखाली आहे. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं गंगापूर, दारणा, पालखेड आशा सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. गंगापूर मधून 5 हजार 884 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरु आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
गणरायाच्या आगमनाबरोबरच राज्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे परिसरात चांगला पाऊस झाला. दरम्यान, गेल्या 15 दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसानं नंदूरबार जिल्ह्यात देखील पावसानं हजेरी लावली आहे. गेल्या 15 दिवसापासून तिथे पाऊस झाला नव्हती. शेतकरी पावसाची वाट बघत होते. अखेर तिथे चांगला पाऊस झाल्यानं शेतकरी समाधानी आहेत. तसेच वर्धा शहरासह ग्रामीण भागांमध्ये जोरदार पाऊस बरसला आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: