Nashik Lok Sabha 2024 : 'नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेकडे पण...'; संकटमोचक धावून आले इच्छुकांच्या मदतीला!
Nashik Lok Sabha 2024 : खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसेच उमेदवार असतील, अशी घोषणा केल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.
Girish Mahajan : शिवेसेनेच्या मेळाव्यातून खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी (Nashik Lok Sabha Constituency) विद्यमान खासदार हेमंत गोडसेच (Hemant Godse) उमेदवार असतील, अशी घोषणा केल्याने नाशिक भाजपच्या इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन (Girish Mahajan) तातडीने नाशिकला धडकले.
नाशकात सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे. एकीकडे शिवसेनेचे हेमंत गोडसे हे तिसऱ्यांदा उभे राहून हॅटट्रिक करण्याच्या तयारीत असून दुसरीकडे लाखोंचा भक्त परिवार असलेल्या स्वामी शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) देखील लोकसभा लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीत तिढा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे मंत्री गिरीश महाजन हे आज नाशकात दाखल झाले.
नाशिक लोकसभेबाबत एकनाथ शिंदे बोलतील
पत्रकारांशी संवाद साधताना गिरीश महाजन यांनी नाशिक लोकसभेच्या जागेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, सध्या नाशिकची जागा ही शिवसेनेकडे आहे. ज्या त्या जागा त्यांनी घ्याव्या. पण त्यात पण कमी जास्त होणार आहे. नाशिक लोकसभेच्या उमेदवारीबाबत श्रीकांत शिंदे यांनी घोषणा केली. मात्र त्याबाबतीत एकनाथ शिंदे बोलतील, असे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.
जागावाटपाचा मुद्दा ताणला जाणार नाही
महायुतीच्या जागावाटपाबाबत गिरीश महाजन म्हणाले की, कालच पहिली 20 लोकांची यादी जाहीर झाली आहे. मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू आहे. एक दोन जागांवर चर्चा करण्यात येत आहे. जागावाटपाचा मुद्दा ताणला जाणार नाही. खेळीमेळीच्या वातावरणात जागावाटप होईल. अजित पवार आणि शिंदेंच्या दोन-तीन जागांचे विषय अद्याप बाकी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला
रावेरमधून रक्षा खडसे यांना भाजपकडून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबत गिरीश महाजनांना विचारले असता ते म्हणाले की, आमची तयारी जोरात आहे. एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी शरद पवारांची भेट घेतली तो त्यांचा विषय आहे. भाजपचा बालेकिल्ला हा जळगाव जिल्हा आहे, असे त्यांनी म्हटले.
निलेश लंके हे काही फार मोठे नेते नाही
निलेश लंके यांनी आज शरद पवार गटाची वाट धरली. यावर गिरीश महाजन म्हणाले की, कोणी नाराज झाले असेल. निलेश लंके हे काही फार मोठे नेते नाही. सगळ्यांना सगळे तिकीट देऊ शकत नाही. लोकांचा विश्वास काँग्रेवर राहिलेला नाही. शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्यावर तर बिलकुलच नाही, असे गिरीश महाजनांनी सांगितले.
उत्तर महाराष्ट्रातल्या 8 च्या 8 जागा आम्ही जिंकू
जळगावातून उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांनी भाजपने उमेदवारी घोषित केली. यावर गिरीश महाजन म्हणाले की, वरिष्ठ पातळीबर निर्णय होतात, सर्व्हे केले जातात. मी त्यांच्यावर नाराज होतो वगैरे असे काही नाही. उत्तर महाराष्ट्रातल्या 8 च्या 8 जागा आम्ही जिंकू. आमचा चांगला स्राईक रेट असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके लढत होणार? असं आहे अहमदनगर दक्षिणचं राजकीय गणित