Dindori Lok Sabha : दिंडोरीत बंडखोरी झालीच, हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात, भारती पवारांची वाट खडतर?
Harishchandra Chavan : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी केली आहे. हरिश्चंद्र चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पाठोपाठ आता महायुतीचीही (Mahayuti) डोकेदुखी वाढली आहे. कारण भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण (Harishchandra Chavan) यांनी बंडखोरी केली असून त्यांनी आज अपक्ष निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. यामुळे भारती पवार (Bharti Pawar) यांची पुन्हा एकदा खासदार होण्याची वाट खडतर होणार का? अशी चर्चा सध्या रंगली आहे.
काही दिवसांपूर्वी माकपचे माजी आमदार जे पी गावित (J P Gavit) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) थेट इशारा दिला होता. माकपची जागा दिंडोरीला सोडावी, नाहीतर शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांना पाडणारच, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर जे पी गावित यांनी दिंडोरीत लोकसभा मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होते. त्यामुळे दिंडोरीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळाले होते.
हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
आता महाविकास आघाडी पाठोपाठ महायुतीत देखील मिठाचा खडा पडला आहे. दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार भारती पवार यांनी एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज (Nomination Form) आज भरला. तर दुसरीकडे भाजपचे दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी केली असून आजच त्यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भारती पवारांच्या कार्यपद्धतीवर चव्हाणांची नाराजी असून गेल्याच आठवड्यात भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला होता. त्यामुळे दिंडोरीत भारती पवारांना तगडे आव्हान निर्माण झाले आहे.
दिंडोरीत बहुरंगी लढत
दरम्यान, आता दिंडोरी लोकसभेत भाजपकडून डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar), शरद पवार गटाकडून भास्कर भगरे (Bhaskar Bhagare), अपक्ष उमेदवार जे पी गावित (J P Gavit) आणि हरिश्चंद्र चव्हाण (Harishchandra Chavan), तर वंचित बहुजन आघाडीकडून मालती थविल (Malati Thavil) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे दिंडोरीत बहुरंगी लढत होणार असून यात कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी ! अखेर नाशिकचा तिढा सुटला, शिवसेना विरुद्ध शिवसेनाच; हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा संधी