Bhavali Dam : मामा-भाचे भावली धरणावर फिरायला गेले, पोहण्याचा मोह आवरला नाही अन् एकापाठोपाठ एक पाच जण बुडाले
Nashik News : इगतपुरी येथील भावली धरणात बुडून मामा-भाच्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिकरोडच्या गोसावीवाडीतील ते रहिवासी होते. या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक : इगतपुरी (Igatpuri) येथील भावली धरणात (Bhavali Dam) बुडून मामा-भाचे अशा एकाच कुटूंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. यात दोन मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. नाशिकरोडच्या (Nashikroad) गोसावीवाडीतील (Gosaviwadi) ते रहिवासी होते. या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हनिफ शेख (24) हे आपल्या भाचा अनस खान दिलदार खान (15), नाझिया इमरान खान (15), मीजबाह दिलदार खान (16) आणि ईकरा दिलदार खान (14 सर्व रा. गोसावीवाडी, नाशिकरोड) यांच्यासोबत पर्यटनासाठी इगतपुरी तालुक्यातील भावली धरणावर गेले होते. शेख हे रिक्षा चालक असून, रिक्षेतूनच पाचही जणांनी प्रवास केला. यापूर्वीही ते भावली धरणात फिरण्यासाठी गेल्याने त्यांनी पुन्हा तेच ठिकाण निवडले होते.
एका पाठोपाठ पाच जण बुडाले
भावली धरण (Bhavali Dam) परिसरात पर्यटनाचा आनंद लुटल्यानंतर धरण्याच्या पाण्यात डुबकी मारण्याचा धाडसी निर्णय या तरुणांनी घेतला आणि तोच त्यांच्या जीवावर बेतला. पाण्यात सुरवातीला दोन जण बुडत होते, त्यांना वाचविण्यासाठी इतरांनी उडी मारली आणि एका पाठोपाठ 5 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच परिसरातील आदिवासींनी धाव घेतली व या घटनेची माहिती इगतपुरी पोलिसांना (Igapuri Police) कळवली. पथकाने धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने पाचही जणांना बाहेर काढले. त्यांना इगतपुरी उपजिल्हा रुग्णालयात (Igatpuri Hospital) दाखल केल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
गोसावीवाडीवर शोककळा
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शेख व खान कुटुंबीय इगतपुरीकडे रवाना झाले. गोसावी वाडीत घटना वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिकांनी गर्दी केली. तर नातेवाईक हे रुग्णालयात दाखल झाले. या घटनेमुळे गोसावीवाडीवर शोककळा पसरली आहे. धरण परिसरात सुरक्षा रक्षक नसल्यानं धरण सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय. धरण परिसरात सुरक्षा रक्षक नेमावे, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
इंदापुरात भीमा नदीत जलसमाधी मिळालेली बोट 17 तासांनी सापडली, 6 जण बेपत्ताच, मृत्यूची दाट शक्यता