Water Shortage : चांदवडमधील ७० गावांचा पाणीपुरवठा 15 दिवसांपासून ठप्प; नागरिक संतप्त
Nashik News : मागील 15 ते 20 दिवसांपासून चांदवड तालुक्यातील 70 गावांचा पुरवठा ठप्प झाल्याने पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. पाणी पुरवठा योजना तत्काळ सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.
Nashik Chandwad News चांदवड : मागील 15 ते 20 दिवसांपासून नाशिकच्या चांदवड तालुक्यातील 70 गावांचा पुरवठा ठप्प झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अनागोंदी कारभारामुळे तालुक्यातील सरपंच संतापले असून 44 गाव पाणी पुरवठा योजना तत्काळ सुरळीत करावी, अशी मागणी केली आहे.
चांदवड तालुक्यातील जवळपास 60 ते 70 गावांना ओझरखेड धरणातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 44 गाव पाणी पुरवठा योजनेद्वारा नियमित पाणी पुरवठा केला जातो. आडगाव ते मंगरूळ फाटा दरम्यान नवीन डी.वाय. पाईपलाईन सुरु करण्याकरिता 44 गाव पाणी पुरवठा योजनेचा पाणी पुरवठा 18 ते 21 जानेवारीपर्यंत बंद करण्यात आला होता. त्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होणे अपेक्षित होते. मात्र 15 दिवस उलटूनही पाणीपुरवठा ठप्पच असल्याने ऐन दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.
लवकरात लवकर पाणी उपलब्ध करून द्यावे
याबाबत ग्रामस्थ समाधान आहेर म्हणाले की, गेल्या 15 ते 20 दिवसांपासून चांदवड तालुक्यात भीषण पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे जनावरे आणि सामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावात 15 दिवस उलटूनही पाणी नाही, याकडे पदाधिकाऱ्यांनी लक्ष घातले पाहिजे. आमदार, खासदारांना सर्व सामान्य जनतेसाठी वेळ नाही. काही दिवसांपासून गावात पाण्याचे टँकर येत नाही. मात्र याकडेदेखील कोणी लक्ष द्यायला तयार नाही. अधिकाऱ्यांना फोन केले तर ते उडवाउडवीचे उत्तर देतात. त्यामुळे अधिकाऱ्यांना याकडे लक्ष घालावे आणि लवकरात लवकर गावात पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
...तर गावे, खेडे रिकामे व्हायला वेळ लागणार नाही
सुतारखेडेचे उपसरपंच वाल्मिकी वानखडे म्हणाले की, चांदवड तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पाणी न मिळाल्याने ग्रामस्थ ग्रामपंचायतीत येऊन हंडा वाजवत आंदोलन करत आहेत. त्यांना आम्ही काय उत्तरे द्यायची. अधिकाऱ्यांना पाण्यासाठी फोन केले तरी ते पाणी देत नाही. दररोज पन्नास लाख लिटर पाण्याचे पंपिंग होते. मात्र पाण्याचे हे करतात तरी काय? नियोजना अभावी पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. अशीच परिस्थिती जर कायम राहिली तर गावे, खेडे रिकामे व्हायला वेळ लागणार नाही.
लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल
गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे म्हणाले की, चांदवड तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती बघता मागच्या वर्षात अत्यंत कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. जवळपास 60 गावे ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठ्यावर चालतात. अलीकडे 18 ते २१ जानेवारीला दुरुस्तीमुळे पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार होता. 21 जानेवारीनंतर पाणी पुरवठा सुरळीत होणे अपेक्षित होते. मात्र आता पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. लवकरात लवकर हा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून देण्यात आले आहे.
आणखी वाचा