Bacchu Kadu : ...तर दर 15 दिवसांनी एका मंत्र्याच्या गाडीची हवा सोडणार; बच्चू कडू यांचा नाशिकमधून थेट इशारा
Bacchu Kadu : बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाने शुक्रवारी रात्री कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिकमधील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.

Bacchu Kadu : शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, त्यांच्या शेतीमालास हमीभाव मिळावा, यासाठी माजी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाने शुक्रवारी रात्री कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या नाशिकमधील निवासस्थानाबाहेर टेंभा आंदोलन केले. याप्रसंगी आंदोलकांनी घोषणाबाजी करत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी केली. मात्र, या मोर्चावेळी बच्चू कडू यांची माणिकराव कोकाटे यांच्याशी नाशिक येथे भेट होऊ शकली नाही. त्यामुळे बच्चू कडू रात्री सिन्नरकडे रवाना झाले होते. यावेळी वाटेतच पोलिसांनी बच्चू कडू यांना अडवले होते. यानंतर बच्चू कडू यांनी 17 तारखेला कर्जमाफीसंदर्भात सकारात्मक निर्णय झाला नाही तर दर 15 दिवसांनी एका मंत्र्यांच्या गाडीची हवा सोडणार, असा थेट इशाराच कृषीमंत्र्यांना दिला आहे.
बच्चू कडू यांचा मोर्चा शुक्रवारी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानी धडकला होता. यावेळी बच्चू कडू म्हणाले की, माणिकराव कोकाटे कृषीमंत्री आहेत म्हणून आम्ही त्यांच्याकडे आलोय. त्यांनी समोर आले पाहिजे होते. शेतकऱ्यांचा मान सन्मान करायला पाहिजे होता. मात्र ते कुठे दडून बसले काय माहिती? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी बद्दल बोलले पाहिजे, सातबारा कोरा करणार हे स्टाईलमध्ये बोलत होते. पण आता ते काहीच बोलत नाहीत. माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य टाळली पाहिजे. गळ्यात आसूड आहे पण त्याची वेळ येऊ देऊ नये, असे त्यांनी म्हटले होते.
शेतकऱ्यांना वेठीस धरू नका
यानंतर बच्चू कडू यांनी माणिकराव कोकटे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. यावेळी बच्चू कडू म्हणाले की, शेतकऱ्यांना वेठीस धरू नका, असे म्हटले. यावर माणिकराव कोकाटे म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत. 17 तारखेला शेतकरी संघटनेसोबतच बैठक घेतली आहे, तुम्ही या. 17 तारीख काय नंतर देखील तुम्ही या, तुमच्यासाठी रेड कार्पेट आहे. मी कधीही खोटं बोलत नाही. सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, असे त्यांनी म्हटले.
बच्चू कडूंना पोलिसांनी सिन्नरला पोहोचण्याच्या आधीच अडवले
यानंतर बच्चू कडू यांनी तुम्ही कुठे आहात असा प्रश्न माणिकराव कोकाटे यांना विचारला. यावेळी माणिकराव कोकटे म्हणाले की, मी 40 किलोमीटर लांब आहे. त्यावर बच्चू कडू म्हणाले आम्ही सिन्नरला येतो. त्यानंतर बच्चू कडू मोजक्या आंदोलकांसह सिन्नरच्या दिशेने रवाना झाले. मात्र बच्चू कडू यांना पोलिसांनी सिन्नरला पोहोचण्याच्या आधीच रस्त्यात अडवले.
...तर दर 15 दिवसांनी एका मंत्र्याच्या गाडीची हवा सोडणार
यानंतर माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा शोध घेण्यासाठी मी आलो होतो. मात्र, तपास लागला नाही. ते आम्हाला सापडले नाही, हे त्यांचे अपयश आहे. त्यांना शोधण्यासाठी आम्ही सिन्नरपर्यंत आलो होतो. पोलीस सांगत होते ते नाशिकला आहेत. माणिकराव कोकाटे सांगत होते ते सिन्नरला आहेत. आम्ही आता 17 तारखेपर्यंत थांबत आहोत. 17 तारखेला शेतकरी संघटनेसंदर्भात कोकाटे बैठक घेणार आहेत. 17 तारखेला कर्जमाफीसंदर्भात सकारात्मक निर्णय झाला नाही तर दर 15 दिवसांनी एका मंत्र्यांच्या गाडीची हवा सोडणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.
आणखी वाचा























