Amruta Pawar : एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्याचं मन इतकं छोटं, अमृता पवारांचं छगन भुजबळांना सडेतोड उत्तर
Chhagan Bhujbal vs Amruta Pawar : विकास कामाच्या उद्घाटनाला निमंत्रित केले नसल्याच्या कारणावरून छगन भुजबळ यांनी विधानसभा अध्यक्षांकडे अमृता पवार यांच्या विरोधात पत्राद्वारे तक्रार केली होती.
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) तोंडावर येवला (Yeola) मतदारसंघात मानापमान नाट्य रंगल्याचे दिसून येत आहे. नांदूरमध्यमेश्वर ग्रामपंचायत अंतर्गत अंगणवाडी आणि आरोग्य केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी निमंत्रित केले नसल्यानं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्रशासन आणि माजी जि प सदस्य अमृता पवार (Amruta Pawar), सुरेखा नरेंद्र दराडे (Surekha Darade) यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती. आता यावरून अमृता पवार यांनी छगन भुजबळांना सडेतोड उत्तर दिले आहे.
विकास कामाच्या उद्घाटनाला निमंत्रित केले नसल्याच्या कारणावरून छगन भुजबळ यांनी विधानसभा अध्यक्षांकडे विशेष अधिकार भंग झाल्याप्रकरणी पत्राद्वारे तक्रार केली. छगन भुजबळ यांच्या पत्राला आता अमृता पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. यामुळे भाजपच्या येवला विधानसभा प्रमुख अमृता पवार आणि छगन भुजबळ यांच्यात संघर्षाला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.
प्रतिस्पर्धी असल्याने भुजबळांनी तक्रार केल्याचा दावा
एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्याने एवढे छोटे मन दाखवले याचे दुःख वाटते. माझ्या निधीतून ही कामे झाली आहेत. त्यांना निमंत्रित न करणे हा हेतू नसल्याचे स्पष्टीकरण अमृता पवार यांनी दिले आहे. तर येवला विधानसभा मतदारसंघातून भाजप नेत्या अमृता पवार निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढविण्यासाठी दराडे कुटुंबाकडून चाचपणी सुरू आहे. आपले प्रतिस्पर्धी असल्याने भुजबळांनी तक्रार केल्याचा दावा देखील अमृता पवार यांनी केला आहे. तर याबाबत आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
शरद पवारांची येवल्यात मोठी खेळी करणार?
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. कारण छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात शरद पवार काही दिवसांपूर्वी आले असता भाजप नेत्या अमृता पवार यांनी शरद पवार यांचं स्वागत केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे अमृता पवार शरद पवार गटात प्रवेश करतात का? मंत्री छगन भुजबळ विरुद्ध अमृता पवार असा सामना आगामी निवडणुकीत रंगणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा