Nashik Crime : तोंडाला काळे फासले, गावातून धिंडही काढली, नाशिकच्या चांदवडमधील संतापजनक प्रकार
Nashik Crime : नाशिकमध्ये विवाहितेला स्थानिक महिलांसह गावकऱ्यांनी तोंडाला काळे फासत गावातून धिंड काढल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.
Nashik Crime : नाशिक (Nashik) जिल्ह्यात पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना समोर आली असून एका विवाहितेला गावातीलच स्थानिक महिलांसह गावकऱ्यांनी तोंडाला काळे फासत धिंड काढल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. नाशिकच्या चांदवड (Chandwad) तालुक्यातील शिवरे गावातील ही घटना आहे. मात्र नेमकी धिंड का काढण्यात आली याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
एकीकडे महाराष्ट्र (Maharashtra) हे पुरोगामी राज्य असल्याचं सातत्यानं सांगितलं जातं. दुसरीकडे अशा प्रकारे एका विधवा महिलेची गावकऱ्यांनीच धिंड काढल्याचे समोर आले आहे. चांदवड तालुक्यातील शिवरे या गावी एका विधवा महिलेच्या तोंडाला काळे फासून, गळ्यात चपलांचा हार घालत तिची गावातून काढल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली आहे. मात्र या घटनेबाबत महिलेकडून अद्याप तक्रार देण्यात आली नसून पोलिसांनी देखील गुन्हा नोंदविला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे धिंड का काढण्यात आली याबाबत अद्याप महिलेकडून किंवा पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
चांदवड तालुक्यातील शिवरे (Shiware Village) या गावी एका कुटुंबातील विवाहितेचा किरकोळ अपघात होऊन तिचा हात फ्रॅक्चर झाला होता. तिच्या हाताला प्लास्टर करण्यात आले होते. तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी तिच्या पतीने तिला माहेरी पोहोचवलं. पत्नी माहेरी असताना पती दोन मुलींसह एक-दोनदा भेटायलाही येऊन गेला. दरम्यान पत्नी माहेरी असतानाच पतीचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले. यावेळी पत्नी दशक्रिया विधीच्या वेळी आली असताना गावातील स्थानिक नागरिकांनी मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. याबाबत व्हिडीओ समोर आला असून यात तिच्या तोंडावर काळे फासण्यात आले असून गळ्यात चपलांचा हार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा निंदनीय प्रकार म्हणावा लागेल, मात्र अद्याप या प्रकरणातील नेमके कारण समोर आले नाही.
महिलेचा तक्रार देण्यास नकार
दरम्यान या घटनेची माहिती वडनेर भैरव पोलिसाना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ गावात जाऊन महिलेची सुटका केली. मात्र महिलेने तक्रार देण्यास नकार दिल्याने अद्याप या प्रकरणी संबंधित संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे महिलेने तक्रार देण्यास का नकार दिला याचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे दिसून येत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात पीडित महिलेने घडलेला प्रसंग सांगितला आहे. व्हिडीओत महिला सांगत आहे की, माझ्या पतीच्या दहाव्याला गेले असताना गावातील लोकांनी हाक मारून माझ्यावर काही आरोप लावून माझ्या मुलांना मारले. माझ्याबरोबर असलेल्या नातेवाईकांनाही मारले. गॅरेजवाल्या भाऊसाहेब याने डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. माझ्या तोंडाला काळे फासून आणि चपलांचा हार घालून गावात माझी मिरवणूक काढली असं त्या महिलेने त्या व्हिडीओत म्हटले आहे.
पोलिसाकडून अधिक तपास
चांदवड तालुक्यातील शिवरे गावात ही घटना घडली आहे. सदर महिला तिच्या पतीच्या दशक्रिया विधीला आली असता तिला मारहाण करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यानुसार तिच्यासह नातेवाईकांना पोलीस ठाण्यात जबाबासाठी बोलविले होते. परंतु सदर महिलेने कोणतीही तक्रार दिली नाही आणि नातेवाइकांनीही त्यासंबंधित माहिती दिली नाही. त्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकला नाही. मात्र घटनेच्या पार्श्वभूमीवर सदर गावात पोलिसांकडून पेट्रोलिंग केले जात आहे. पोलिसाकडून अधिक माहिती घेतली जात असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक गौतम तायडे यांनी म्हटले आहे.