Nashik Rohit Pawar : एकनाथ शिंदे फक्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहे का? रोहित पवार यांचा सवाल
Nashik Rohit Pawar : ज्यावेळी अनेक गोष्टी हाताबाहेर जातात, त्यावेळी अशी वक्तव्ये केली जात असल्याचे रोहित पवार म्हणाले.
Nashik Rohit Pawar : ज्यावेळी अनेक गोष्टी हाताबाहेर जातात, त्यावेळी अशी वक्तव्ये केली जातात. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) फक्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहे का? या गोष्टी अयोग्य आहे. सर्व समाजासाठी एकत्रित धोरण ठरविणे गरजेचे आहे.इतर समाजाचे देखील प्रलंबीत प्रश्न आहे, ते सोडविणे आवश्यक असल्याचे सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विधानावर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी जोरदार टीका केली आहे.
नाशिकमध्ये (Nashik) आज महाराष्ट्र व्हिजन फोरम च्या माध्यमातून युवकांशी संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. जळगावमधील एका कार्यक्रमात गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी मराठा चेहरा असावा यासाठी गद्दारी केली, असे वक्तव्य केले. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यावेळी अनेक गोष्टी हाताबाहेर जातात, त्यावेळी अशी वक्तव्ये केली जातात. एकनाथ शिंदे फक्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहे का? या गोष्टी अयोग्य आहे..सर्व समाजासाठी एकत्रित धोरण ठरविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
औरंगाबादच्या (Aurangabad) नामांतरावर रोहित पवार म्हणाले की, आम्ही तेव्हाच स्वागत केलं होतं..महाविकास आघाडीत तेव्हाच निर्णय घेतला होता..आम्ही याचे स्वागत करतो. तर आजच्या निर्णयानंतर गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर नामांतरा संदर्भात ट्विट केले आहे. यावर ते म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म माझ्या मतदारसंघात झाला, लोकांचे मत जाणून घेतले पाहिजे. राजकारण न करता सर्व जण एकत्र आले पाहिजे. पण फक्त नामांतर हा विषय न घेता, इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहे. तसेच नामांतराचा निर्णय कुणी घेतला, हे जनतेला माहित आहे. तर आज नामांतराच्या मुद्द्यावरून एमआयएम विरोध करत आहे, यावर ते म्हणाले कि, आता नामांतराचा निर्णय झाला आहे..विकास आणि नोकरी याबाबत निर्णय व्हावे..भावनिक राजकारण होऊ नये, एमआयएमचा फायदा कुणाला झाला, त्यांनी कुणाचे मते खाल्ले? याचा अभ्यास जनतेने करावा..त्यांनी मतं खाऊ नये, कार्यकर्त्यांना निवडून आणावे, असा सल्ला रोहित पवार यांनी यावेळी दिला.
केजरीवाल ठाकरे भेट, सुप्रिया सुळे आणि कांदा दरावर रोहित पवार म्हणाले
अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरे भेटीवर रोहित पवार म्हणाले की, भाजपच्या विरोधातील जे जे पक्ष आहे, त्यांनी एकत्रित येण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपकडे आर्थिक ताकद खूप आहे. केंद्रीय संस्था या भाजपच्या इशाऱ्यावर चालतात का, असा प्रश्न जनतेत आहे..तर सुप्रिया सुळे यांच्या बॅनर बाजीवरून ते म्हणाले की, कार्यकर्ता काय लावतो, हा विषय आहे..पण प्रेमापोटी हे सगळं होत असतं. निर्णय घेताना सर्व नेते एकत्रित निर्णय घेतात. विरोधी पक्षाकडे कोणताही मुद्दा नसल्याने ते असे विषय काढत आहे..भाजपमध्ये काय खदखद आहे, हे आपण बघतो. निष्ठावंत लोकांना तिथे संधी दिली जात नाही. त्यांना जेवढे घ्यायचे, तितक्या जास्त प्रमाणात घेऊन जा..म्हणजे युवकांना संधी मिळेल, असेही ते म्हणाले. तसेच गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर गडगडले असून शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. यावर रोहित पवार म्हणाले कि, याला धोरण जबाबदार आहे..नाफेडने खरेदी करावी, पण नाफेडला पत्र देणं, हे राज्य सरकारचे काम आहे..पण त्यांचे नेते निवडणुकीत व्यस्त आहे..याला राज्य सरकार जबाबदार आहे..पण केंद्र सरकार देखील निर्यातीच्या धोरणाला जबाबदार असल्याची टीका रोहित पवार यांनी केली.