Nashik : महापुरुषांबद्दल अपशब्द, तरुणांची डोकी फिरवणाऱ्या भिडेंना अटक करा, नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
Nashik News : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहेत.
Nashik News : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यभरात आंदोलनं (Protest) करण्यात येत आहेत. भिडे गुरुजींनी महात्मा गांधी यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे काँग्रेसच, राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतल्याने आज नाशिक शहरात संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून हे आंदोलन करण्यात आले.
गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यात भिडे (Manohar Bhide) यांच्या वक्तव्यावरून नवा वाद रंगला आहे. संभाजी भिडे सातत्याने वादग्रस्त विधाने करत असल्याने राजकीय नेत्यांकडून अटकेची मागणी करण्यात येत आहे. अनेक राजकीय नेत्यांकडून संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला जात आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अटकेची मागणी केली आहे. अशातच नाशिकमध्ये (Nashik) अजित पवार गटाकडून आंदोलन करण्यात आले. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. भिडेंना अटक करा, कारवाई करा अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदनही देण्यात आले.
संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी आणि महात्मा जोतीराव फुले यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्ये केल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. भिडे यांच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलन केली जात आहेत. नाशिक शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते, कार्यकर्ते यासह जिल्ह्यातील अनेक पुरोगामी पक्ष व संघटना यां आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. यावेळी संभाजी भिडे यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत महात्मा गांधीजी आणि महात्मा जोतीराव फुले यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भिडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.
देशात वातावरण दूषित करण्याचं काम
छगन भुजबळ यांनी भिडेंवर कारवाई झालीच पाहिजे, यासाठी सरकारने कठोर पाउल उचलावे असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविरुद्ध अत्यंत गलिच्छ भाषेत वक्तव्य केले. त्यानंतर महात्मा फुले यांच्याबद्दलही वादग्रस्त विधान केले. भिडे यांची बुद्धी भ्रष्ट झालीय की, त्याच्याकडून कोणी बोलून घेत आहे, हे तपासण्याची गरज आहे. मनोहर भिडे 15 ऑगस्टसुद्धा मानायला तयार नाहीत, देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करायला पाहिजे. राज्यात देशात वातावरण दूषित करण्याचं काम करत असून त्याविरोधात सर्वाना एकत्र आले पाहिजे, असेही भुजबळ म्हणाले.