Ahmednagar Prisoners Escaped : संगमनेर पोलिसांच्या हातावर तुरी, 'फिल्मी स्टाईल'नं चार कैदी कारागृहातून फरार, काय घडलं नेमकं?
Ahmednagar News : संगमनेर कारागृहात पोलीस कर्मचारी ड्युटीवर असताना चार कैद्यांनी तुरुंग तोडून पळ काढला आहे.
![Ahmednagar Prisoners Escaped : संगमनेर पोलिसांच्या हातावर तुरी, 'फिल्मी स्टाईल'नं चार कैदी कारागृहातून फरार, काय घडलं नेमकं? Ahmednagar Latest News For Criminals escaped by breaking jail prison in Sangamner jail Maharashtra news Ahmednagar Prisoners Escaped : संगमनेर पोलिसांच्या हातावर तुरी, 'फिल्मी स्टाईल'नं चार कैदी कारागृहातून फरार, काय घडलं नेमकं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/08/ab40443541a60540ab3585fb7289db2f1699437176418738_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संगमनेर (Sangamner) तालुक्यातील पोलीस ठाण्यातून सुमारास 4 कैद्यांनी पलायन केलं आहे. कारागृहाचे गज तोडून हे चारही कैदी फरार झाले आहेत. बुधवारी पहाटेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. फरार झालेल्या कैद्यांवर बलात्कार, खून, दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलीस (Sangamner Police) ठाण्यातील कारागृहात 4 कैद्यांना ठेवण्यात आलं होतं. बुधवारी पहाटेच्या सुमारास या कैद्यांनी कारागृहाचे गज तोडून धूम ठोकली. यावेळी चार पोलीस कर्मचारी ड्युटीवर असताना देखील गुन्हेगारांनी पळ काढल्याने संगमनेर पोलीस सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. राहुल काळे, मच्छिंद्र जाधव, रोशन थापा ददेल, अनिल काळे असे जेलमधून पसार झालेल्या आरोपींची नावे आहेत. महत्वाचे म्हणजे बलात्कार, खून (Murder) अशा गंभीर गुन्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फरार झालेल्या आरोपींच्या शोध घेण्याकरिता पाच पथके रवाना केल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी दिली आहे.
दरम्यान जेलमधून कैदी पळून गेल्याने संगमनेर पोलिसात खळबळ उडाली आहे. कारागृहातील कैद्यांना गुटखा, तंबाखू, बाहेरचे जेवण, मोबाईल आदी सुविधा सहज उपलब्ध होत असल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. या प्रकरणामुळे नागरिकांनी देखील पोलिसांच्या कृतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्य न दाखवल्याने चार जणांनी गज कापून पलायन केले असल्याची चर्चा सुरू आहे. दिवसाढवळ्या पोलिसांच्या नाकावर टिच्चून गुन्हेगार पळ काढत असतील तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेच काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वर्षभरापूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती
वर्षभरापूर्वी दोन आरोपींनी संगमनेर कारागृहातून (Sangamner Jail) पलायन केल्याची घटना घडली होती. आज त्याच घटनेचा प्रत्यय आला असून आज सकाळी पावणे सातच्या सुमारास संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या उपकारागृहाचे गज तोडून गुन्हेगारांनी पलायन केल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून आरोपींचा शोध घेण्याच आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांची झोपच उडाली. फरार झालेल्या कैद्यांच्या शोधात पोलिसांनी वेगवेगळी पथके रवाना केली आहे. गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेले आरोपी कारागृहातून फरार झालेच कसे? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
इतर महत्वाची बातमी :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)