Aditi Tatkare : आव्हाडांचे वक्तव्य हास्यास्पद; वडिलांवर केलेल्या टिकेला कन्या आदिती तटकरेंनी दिले उत्तर
Aditi Tatkare : जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांच्या भूमिकेसाठी सुनील तटकरे जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यावर आदिती तटकरे यांनी जितेंद्र आव्हाडांना उत्तर दिले आहे.
Aditi Tatkare News नाशिक : अजित दादा (Ajit Pawar) हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. गेल्या 40 वर्षांपासून ते राजकारणात सक्रीय आहेत. अजित दादा दुसऱ्यांचे सांगून ऐकतील असे ते नाहीत. जितेंद्र आव्हाडांचे (Jitendra Awhad) वक्तव्य हास्यास्पद आहे. त्यांनी अनेक वेळा आपली भूमिका बदलली आहे. आपल्या बोलण्याने लोकांच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे, असे उत्तर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांच्या भूमिकेसाठी सुनील तटकरे जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यावर सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बाल व निरीक्षणगृहाच्या विस्तारीत वास्तूच्या उद्घाटनासाठी त्या आज नाशिक येथे आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
'त्या' वक्तव्याचा निषेध
जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबाबत केलेल्या वक्तव्याचा त्यांनी निषेध व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, लोकांच्या भावना दुखावणे सारखे वक्तव्य करता, यावर विचार करायला हवा. धार्मिक भावना कोणीही दुखवू नये, आपल्या वक्तव्यातून कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी.
कुपोषणावर नाशिक जिल्ह्याची स्वतंत्र बैठक
यावेळी आदिती तटकरे म्हणाल्या की, लेक लाडकी योजनेला आम्ही प्रोत्साहन देत आहोत. कुपोषणावर देखील आम्ही लक्ष केंद्रीय केले आहे. कुपोषणावर नाशिक जिल्ह्याची स्वतंत्र बैठक आम्ही घेणार आहोत. तसेच महिला सशक्ती करण अभियानाला देखील आम्ही सुरवात केली आहे. बाल हक्क संरक्षणावर देखील आम्ही लक्ष केंद्रित केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अंगणवाडी सेविकांनी कामावर रुजू व्हावे
अंगणवाडी सेविका प्रश्नावर मी आतापर्यंत 8 वेळा बैठका घेतल्या आहेत. त्यांच्या अनेक मागण्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यातील 3 हजार अंगणवाडी सेविकांचे प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत. सेविकांचे इन्शुरन्स सरकार भरणार आहे. त्यांची मानधन संदर्भात जी मागणी आहे ती गेल्या 4 ते 5 वर्षांपासून आहे. 20 टक्के मानधन याआधीचे लागू करण्यात आले आहे. सेविकांना पेन्शन लागू झाली पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. त्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. मात्र काही गोष्टींना वेळ लागतो. त्यामुळे काम थांबवू नये, हे आमचे आवाहन आहे, त्यांनी कामावर रुजू व्हावे. काही मागण्या या धोरणात्मक आणि केंद्राच्या अखत्यारीत आहे, त्याबाबतही प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
बालगृहाच्या सभागृहाचे व कार्यालयाचे उद्घाटन
दरम्यान, बालगृहाच्या सभागृहाचे व कार्यालयाचे आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या की,अनाथ झालेले, एखाद्या गुन्ह्यात दोषी ठरलेले किंवा नैसर्गिक आपत्तीत हरवलेले अशा मुलांचे पुनर्वसन निरीक्षण व बालगृहात होत असते. परिस्थितीने पोरकं केल्यानंतर बालगृहांसारख्या संस्था मुलांना मायेचा आधार देऊन सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम करतात, असे प्रतिपादन त्यांनी केले.
इतर महत्वाच्या बातम्या
Sushma Andhare : सुषमा अंधारेंना 'ते' वादग्रस्त वक्तव्य भोवलं; मालेगावात गुन्हा दाखल