Nandurbar : नंदुरबारमध्ये भाजपला मोठा हादरा? मंत्री विजयकुमार गावितांचे बंधू बंडखोरीच्या तयारीत
Rajendrakumar Gavit : राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या बंधूंनी विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. यामुळे भाजपला नंदुरबारमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
नंदुरबार : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election 2024) वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे आता तिकीटासाठी राजकीय नेते आतापासूनच फिल्डिंग लावत असल्याचे दिसून येत आहे. काही नेत्यांकडून पक्षाने तिकीट दिले नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली जात आहे. त्यातच आता नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात भाजपला (BJP) मोठा धक्का बसण्याचे संकेत मिळत आहे.
कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणत्याही परिस्थितीत शहादा-तळोदा मतदारसंघातून (Shahada-Taloda Assembly Constituency) निवडणूक लढवणारच, अशी घोषणा भाजप नेते राजेंद्रकुमार गावित (Rajendrakumar Gavit) यांनी केली आहे. त्यामुळे विधानसभेआधी भाजपमध्ये पहिली बंडखोरी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
आमदार राजेश पाडवी यांच्या अडचणीत वाढ ?
राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांचे बंधू भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित हे बंडखोरीच्या तयारीत असल्याची चर्चा आता नंदुरबारमध्ये रंगली आहे. कारण शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघात राजेंद्रकुमार गावित यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे आता भाजपचे विद्यमान आमदार राजेश पाडवी यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच
राजेंद्रकुमार गावित यांनी शुक्रवारी तळोदा तालुक्यातील बोरद येथे कार्यकर्त्यांची संवाद बैठक घेतली. यावेळी अनेकांनी आपल्या मनोगतातून मतदारसंघातील समस्यांविषयी तीव्र भावना व्यक्त केल्या. काही कार्यकर्त्यांनी तर मतदारसंघात गावगुंडांची दादागिरी सुरू असल्याचेही चर्चेद्वारे सांगितले. या मतदारसंघाच्या विकासाला चालना देणारा आमदार हवा अशी साद कार्यकर्त्यांनी घातली. यानंतर कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच, असे राजेंद्रकुमार गावित यांनी स्पष्ट केले आहे.
2019 साली राजेंद्रकुमार गावितांचा भाजपमध्ये प्रवेश
राजेंद्रकुमार गावित हे देवमोगरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष असून डॉक्टर विजयकुमार गावित यांचे बंधू आहेत. यापूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी मुलाखत दिली होती. 2014 मध्ये त्यांनी शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. पुढे 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांना निवडणुकीचे तिकीट नाकारण्यात आले. आता आगामी विधानसभेची निवडणूक आपण लढवणारच असं गावित यांनी स्पष्ट केल्याने भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
विजयकुमार गावितांच्या लेकीविरोधात जिल्हा परिषदेत अविश्वास ठराव; मनमानी कारभारामुळे अडचणीत येणार?