Nandurbar Ladki Bahin Yojana : केवायसीला गावात नेटवर्क नाही, 'लाडक्या बहिणींना' सातपुड्याचा डोंगर चढून घ्यावा लागतोय सिग्नलचा शोध, झाडांच्या फांद्यांवर फोन अडकवतात अन्...
Nandurbar Ladki Bahin Yojana : शासनाची योजना सुलभ होण्याऐवजी, नेटवर्कच्या अडचणींमुळे महिलांसाठी ही एक मोठी परीक्षा ठरत आहे. ही समस्या केवळ नंदुरबारमध्येच नाही, तर देशभरातील अनेक ग्रामीण भागांमध्ये डिजिटल इंडियासमोरील आव्हान आहे.

Nandurbar Ladki Bahin Yojana : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील नर्मदा काठावरील खर्डी खुर्द गावातील महिलांना 'माझी लाडकी बहीण योजने'साठी (Majhi Ladki Bahin Yojana) e-KYC करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 'शासनाने खर्डी खुर्द गावात नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून महिलांचे केवायसी पूर्ण होईल,' अशी कळकळीची विनंती गावकरी करत आहेत. गावात इंटरनेट नेटवर्कची सुविधा अत्यंत कमकुवत असल्याने, या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना डोंगरावर चढाई करावी लागत आहे. अनेक जणी तासनतास टेकडीवर बसून राहतात, तर काही जणी झाडाच्या फांदीला काठीने मोबाईल बांधून सिग्नल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. शासनाची योजना सुलभ होण्याऐवजी, नेटवर्कच्या अडचणींमुळे महिलांसाठी ही एक मोठी परीक्षा ठरत आहे. ही समस्या केवळ नंदुरबारमध्येच नाही, तर देशभरातील अनेक ग्रामीण भागांमध्ये डिजिटल इंडियासमोरील आव्हान आहे.
Nandurbar Ladki Bahin Yojana : खर्डी खुर्द गावात नेटवर्क किंवा फॉर्म भरण्याची सुविधा करून द्यावी
एकंदरीत योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असतानाच नेटवर्कच्या अडचणीमुळे लाडक्या बहिणींना मोठी अडचण होत आहे नेटवर्कसाठी त्यांना कित्येक तास डोंगरावरच बसवून राहण्याची वेळ येत आहे. याबाबत एका ग्रामस्थांनी माहिती देताना सांगितलं की, लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांना केवायसी पूर्ण करायचे आहे म्हणून त्यांना या ठिकाणी येतात, त्या महिलांना गावात नेटवर्क मिळत नाही. तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तरी शासनाला विनंती आहे. खर्डी खुर्द गावात नेटवर्क किंवा फॉर्म भरण्याची सुविधा करून द्यावी, आमच्या गावातील महिला आहेत त्यांची जेणेकरून केवायसी पूर्ण होईल.
नर्मदा काठावरील खर्डी खुर्द गावात महिलांना सध्या दररोज डोंगर चढाईचा सामना करावा लागत आहे. ही चढाई पाणी किंवा सरपणासाठी नाही, तर ‘लाडकी बहीण’ योजनेच्या पोर्टलवर ई-केवायसी करण्यासाठी आहे. मात्र, सर्वात वेदनादायक बाब म्हणजे डोंगर चढून गेल्यानंतरही नेटवर्क मिळत नाही. परिणामी, महिलांना तासन्तास उन्हात, वाऱ्यात आणि पावसात डोंगरावर थांबावे लागत आहे. सातपुड्याच्या डोंगररांगांमधील अनेक गावांत अजूनही इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्याने ग्रामीण महिलांना ही क्लेशदायक परिस्थिती सहन करावी लागत आहे. खर्डी खुर्द, नवापूर, अक्कलकुवा आणि तालोदा परिसरातील अनेक गावांत महिलांना दररोज नेटवर्कच्या शोधात फिरावे लागते.
Nandurbar Ladki Bahin Yojana : मोबाईल झाडांच्या फांद्यांवर किंवा उंच काठीला बांधून ठेवतात
काही महिला तर मोबाईल झाडांच्या फांद्यांवर किंवा उंच काठीला बांधून ठेवतात, जेणेकरून थोडंफार नेटवर्क मिळून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल. परंतु, इंटरनेट नसल्याने त्या अनेकदा रिकाम्या हाताने घरी परततात. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष या समस्येकडे वेधले असून, “शासनाच्या योजना मिळवण्यासाठीसुद्धा एवढा त्रास सहन करावा लागतो, हे दुर्दैवी आहे,” अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. इंटरनेट सेवा सुरळीत व्हावी आणि ग्रामीण भागातील महिलांना या धडपडीपासून मुक्तता मिळावी, अशी मागणी आता सातपुड्यातून जोर धरू लागली आहे.
























