Success Story : पतीच्या निधनानंतर खचल्या नाहीत, शेतीत नवे प्रयोग करुन कुटुंबाचा गाडा सांभाळला; नंदुरबारमधील कल्पना मोहिते यांची प्रेरणादायी कहाणी
Success Story : नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील वडाळी गावातील कल्पना मोहिते यांची प्रेरणादायी कहाणी अनेकांसाठी आदर्श होऊ शकते.
Success Story : घरातील स्त्रीला लक्ष्मी म्हणून ओळखतात. घरातील महिला ही जर खंबीरपणे कोणत्याही संकटाचा समोरं उभी राहिली तर घरात लक्ष्मी वास करत असते. नंदुरबारच्या (Nandurbar) शहादा तालुक्यातील वडाळी गावातील कल्पना मोहिते (Kalpana Mohite) यांची प्रेरणादायी कहाणी अनेकांसाठी आदर्श होऊ शकते. 2006 मध्ये पतीचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावर मुलांच्या शिक्षणाची आणि घर चालवण्याची जबाबदारी आली. संकटांशी दोन हात करत दहा किलोमीटर अंतरावरुन तापी नदीतून पाईपलाईन करुन पाणी आणत आपली शेती बागायती केली. स्वतःची शेती आणि भाडेतत्त्वावर घेतलेली पंधरा एकर शेती त्या स्वतः करु लागल्या. पुरुषाप्रमाणे शेतीतील नांगरणी, वखरणी, पिकांना फवारणी ही सर्व कामं करत त्यांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षित करुन पतीच्या निधनानंतर ही व्यवस्थित आर्थिक घडी बसवली.
पुरुषाप्रमाणे शेतातील सर्व कामं करतात
वडाळी इथल्या कल्पना मोहिते या पतीच्या निधनानंतर खचून न जाता त्यांनी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि तोच सार्थकी लावला. चार मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्यावर आली. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम. अवघी तीन एकर जमीन मात्र त्या डगमगल्या नाहीत. पतीच्या निधनानंतर त्यांनी घराची जबाबदारी सांभाळली. आणखी 15 एकर जमीन त्यांनी भाडेतत्वावर घेतली आणि शेती करण्यास सुरुवात केली. एखाद्या पुरुषाप्रमाणे शेतीतील सर्व काम करु त्या लागल्या. त्यात त्यांना मोठ्या प्रमाणात फायदाही होऊ लागला. पुरुषाला लाजवेल अशी सर्व कामे करु लागल्या. त्या स्वतः वखरणी, नांगरणी करतात. पिकांना फवारणी करतात. मजुरांसोबत त्या स्वतः काम करतात, भाजीपाला पिकांचं उत्पन्न घेतात. सर्व शेतीच बागायती झाल्याने ते आता केळी पपई आणि इतर बागायती पिकांचे विक्रमी उत्पन्न घेत आहेत. त्यांनी एक नवीन आदर्श शेतकरी अशी ओळख निर्माण केली आहे
नोकरी सोडून इंजिनिअर मुलाची शेतीत आईला मदत
शेतीत काबाड कष्ट करुन त्यांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करुन त्यांच्या मुलगा एका चांगल्या कंपनीत नोकरी करत होता. मात्र तोही आता मुंबईतील नोकरी सोडून शेतीत आपल्या आईला मदत करु लागला आहे. मुलाप्रमाणे तीन मुलींना उच्चशिक्षण दिले आहे. त्यांनी खंबीरपणे आपली जबाबदारी पूर्ण केली असून त्यासोबतच त्यांनी आधुनिक शेतीची कास धरुन अनेक नवनवीन प्रयोग यशस्वी केले आहेत
मुलांना आईचा अभिमान
कल्पना मोहिते यांच्या मुलांना आपल्या आईच्या कार्याचा सार्थ अभिमान आहे. वडिलांचं छत्र हरपल्यानंतर आईच वडील म्हणून पुढे आली आणि शेतीत नवनवीन प्रयोग करत घराला आर्थिक संपन्न केलं, असं कल्पना मोहिते यांची मुले सांगतात. महिलेला घराची कारभारीण म्हणतात. ती घराची लक्ष्मी असते. तिच्या नियोजनाने घरगाडा चालत असतो मात्र कल्पना मोहिते यांनी स्वतःच्या मेहनतीने आपल्या जीवनाचा कायापालट केला आहे.