Nanded News : NIA कडून 43 कुख्यात गँगस्टर्सची नावं अन् फोटो जारी; नांदेडमध्ये आसरा घेण्याच्या शक्यतेनं पोलीस अलर्ट
Nanded News: राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून देशभरातील 43 कुख्यात गँगस्टर्सची यादी जाहीर करण्यात आली असून नांदेड प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
Maharashtra Nanded News : राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (National Investigation Agency) देशभरातील 43 कुख्यात गँगस्टर्सची यादी जाहीर केली आहे. या यादीतील अनेकजण यापूर्वी नांदेडला (Nanded News) येऊन गेलेले असू शकतात, असा संशय तपास यंत्रणांना आहे. सध्या हे सर्व गँगस्टर फरार असून ते नांदेडमध्ये आश्रय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावं, अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद काही आढळल्यास तातडीनं पोलिसांशी संपर्क करावा, असं आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेनं देशभरातील 43 कुख्यात गँगस्टर्सची यादी जाहीर केली असून याच पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट असून खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे.
दहशतवादी रिंदामुळे नांदेड रडारवर
दहशतवादी हरविंदरसिंह रिंदा हा नांदेडामध्ये अनेक वर्ष वास्तव्यास होता. त्यानं याठिकाणी खंडणीसाठी अनेकांना धमकावलं देखील होतं. काही जणांवर गोळीबारही केला होता. बियाणीच्या हत्येचा मुख्य सूत्रधारही दहशतवादी हरविंदरसिंह रिंदाचं होता. तसेच, सीमेपलीकडून रिंदाच्या सहकाऱ्यांनी देशात शस्त्रं आणली होती. रिदाचे अनेक साथीदारही आज नांदेडात आहेत. तर दुसरीकडे पंजाबमध्ये गंभीर गुन्हे करणारे आरोपीही नांदेडमध्ये आश्रय घेतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.
दहशतवादी रिंदाचं नांदेड कनेक्शन आणि संजय बियाणी हत्या प्रकरण...
नांदेडातील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. संजय बियाणी हत्येप्रकरणी हरविंदरसिंह रिंदा या दहशतवाद्याचं नाव समोर आलं होतं. कारण संजय बियाणी यांच्या हत्येअगोदर एक वर्षापूर्वी त्यांना दोन कोटींच्या खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी रिंदानं दिली होती. त्यानंतर अनेक वर्षानंतर रिंदा हे नाव चर्चेत आलं होतं. तर संजय बियाणी यांच्या हत्येनंतर रिंदाच्या नावानं अनेक व्यावसायिकांना धमकी पत्र आणि थ्रेड कॉल येणं सुरू झालं होतं. तर खुद्द नांदेड जिल्ह्याचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनाही रिंदानं खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र पाठवल्याचं समोर आलं होतं.
दहशतवादी रिंदाचा पाकिस्तानात झालेला मृत्यू
भारतातून निसटून पाकिस्तानात गेलेल्या हरविंदरसिंह रिंदा याचा पाकिस्तानातील लाहोरमध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. रिंदाचा लाहोरमधील रुग्णालयात मृत्यू झाला होता. अंमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता. हरविंदरसिंह रिंदा हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या (ISI) सांगण्यावरून काम करत होता. रिंदा हा पंजाबसह देशात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरून ड्रोनद्वारे पाकिस्तानातून शस्त्रे पाठवायचा. पंजाबमधील अनेक मोठ्या घटनांमध्येही त्याचं नाव पुढे आल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता.