(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ambadas Danve: नांदेडचे शिवसेना जिल्हाप्रमुख आणि उपतालुकाप्रमुख एकमेकांना भिडले, फ्री स्टाईल हाणामारीची जोरदार चर्चा
Nanded Shivsena News: विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दौऱ्याआधीच ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे.
नांदेड: शिवसेना ठाकरे गटाच्या नांदेड जिल्हाप्रमुख बबन बारसे आणि मुदखेड उपतालुकाप्रमुख गुलाब देशमुख यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना आज घडली. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दौऱ्याआधीच झालेल्या या हाणामारीची चर्चा संपूर्ण जिल्हाभर आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दौऱ्यानिमित्त तयारीसाठी गुरुवारी शासकीय विश्रामगृहात शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाप्रमुख बबन बारसे आणि मुदखेड उपतालुकाप्रमुख गुलाब देशमुख यांच्यात यावेळी शाब्दिक चकमक उडाली. नंतर हा वाद वाढला आणि या दोघांत थेट फ्री स्टाईल हाणामारी झाली. त्यानंतर हा वाद शिवाजीनगर पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला. विरोधी पक्ष नेत्याच्या दौऱ्यापूर्वीच ठाकरे गटात गोंधळाचे वातावरण असल्याचे दिसून आले.
विरोधी पक्षनेता अंबादास दानवे हे शुक्रवारी हिंगोली आणि नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. सायंकाळी जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत. त्याच्या दौऱ्याच्या तयारीसाठी गुरुवारी शासकीय विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संपर्क प्रमुख बबन थोरात हे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची स्तुती करीत होते. त्याचवेळी मुदखेड उपतालुकाप्रमुख गुलाब देशमुख हे उठले, आम्हाला दोन मिनिटे बोलू द्या, असे म्हणून त्यांनी थोरात यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी थोरात यांनी देशमुख यांना खाली बसविले, आणि पुन्हा बोलण्यास सुरुवात केली.
परंतु परत एकदा गुलाब देशमुख उठले आणि त्यांनी थोरात यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतप्त झालेल्या थोरात यांनी देशमुख यांना बाहेर निघून जा असे सांगितले. त्यावर देशमुख यांनी आम्हाला गेट आऊट म्हणता का असा सवाल केला. तोच जिल्हाप्रमुख बबन बारसे हे रागाने देशमुख यांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर दोघांमध्ये फ्री स्टाईल हाणमारी झाली.
या हाणामारीनंतर गुलाब देशमुख यांनी तक्रार देण्यासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. यावेळी इतर पदाधिकाऱ्यांनी मध्यस्ती करुन त्यांची समजूत घातली. एकूणच या प्रकारामुळे ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. आधीच शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटातील अनेक नेत्यांना फोडलं आहे, त्यात आता पुन्हा वाद. अशा अवस्थेत ठाकरे गटाचे नेते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
ही बातमी वाचा: