स्वार्थासाठी प्रज्ञा सातवांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला; स्थानिक कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेशावर सडकून प्रहार, वडेट्टीवार म्हणाले, 'पाच वर्ष आमदारकी शिल्लक होती तरीही..'
प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विकासासाठी गेल्याचे सांगितले. मात्र, काँग्रेस सोडण्यावर त्यांनी चकार शब्दही काढला नाही. विजय वडेट्टीवार यांनी सडकून प्रहार केला.

Pradnya Satav Joins BJP: काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी पाच वर्षे आमदारकी शिल्लक असतानाही काँग्रेसला रामराम करत आज (18 डिसेंबर) भाजपमध्ये प्रवेश केला. प्रज्ञा सातव यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपत घरोबा केला. यामुळे हिंगोलीमधील स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रज्ञा सातव यांच्यावर काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा गंभीर आरोप केला. प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश करून घेतला हा वैयक्तिक स्वार्थासाठीच असल्याचा हल्लाबोल कार्यकर्त्यांनी केला. एबीपी माझाशी बोलताना स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रज्ञा सातव यांच्यावर हल्लाबोल करताना काँग्रेस पक्ष हा 140 वर्षांचा असून काही फरक नसल्याचे सांगितले. विधान परिषदेला विरोधी पक्षनेता मिळू नये यासाठी भाजपने प्रज्ञा सातव यांचा प्रवेश करवून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.
विजय वडेट्टीवार यांचा सडकून प्रहार
दरम्यान, प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विकासासाठी गेल्याचे सांगितले. मात्र, काँग्रेस सोडण्यावर त्यांनी चकार शब्दही काढला नाही. दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र प्रज्ञा सातव यांच्या निर्णयावर सडकून प्रहार केला आहे. पाच वर्ष शिल्लक असतानाही असा निर्णय घेतला असेल तर हे स्वार्थी लोक असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. राजीव सातव यांच्या अर्धांगिनी इतकंच काही तो त्यांचा काँग्रेस पक्षाशी संबंध असल्याचं ते म्हणाले.
राजीव सातव यांच्या अर्धांगिनी, तेवढाच पक्षाशी संबंध
ते पुढे म्हणाले की प्रज्ञा ताईंसोबत फार कार्यकर्ते गेले असेही नाही. त्यांचं संघटनेत फार योगदान होतं असंही नाही. राजीव सातव यांच्या अर्धांगिनी म्हणून त्यांचा तेवढाच पक्ष संबंध होता. त्यामुळे हा धक्का वगैरे काही नसून हे स्वार्थी लोक आहेत. राहुल गांधी यांच्याशी भावनिक संबंध असल्याने मला वाटत नव्हतं की प्रज्ञाताई हे सर्व विसरून अशा पद्धतीने निर्णय घेतील. ते म्हणाले की पाच वर्षाच्या आमदारकी शिल्लक होती. अशा परिस्थितीत कुठे अडचण आणणार आहे का? त्यापर्यंत आम्ही गेलो नाही.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षनेता नको आहे
विरोधी पक्षनेतेपदावरूनही वडेट्टीवार यांनी भाजपव तोफ डागली. ते म्हणाले की, आता तर अडवण्याचं काम आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्ष नेता नको आहे. विरोधी पक्ष नेत्याशिवाय सरकार चालवायचा आहे, असा प्रयोग त्यांना करायचा आहे. त्यामुळे कदाचित ती बाजू सुद्धा असू शकते. त्यामुळे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसपासून दूर नेता येईल, अशी शंकाही वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. विधानपरिषदेत काही अट नव्हती, आमदार आमच्याकडे होते, या अधिवेशनात ते करू शकले असते, असेही वडेट्टीवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या























