Nanded Rain Update : नांदेड जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाची हजेरी, 'एसडीआरएफचे' जवान तळ ठोकून
Nanded Rainfall Update : नांदेड शहर व तालुका परिसरातही गेल्या 2 दिवसांपासून पूर्ण पावसाळी वातावरण आहे.
Nanded Rainfall Update : जून महिना उलटला आणि जुलै महिना देखील अर्धा संपत आला असतांना अपेक्षित पाऊस न झाल्याने चिंता वाढली होती. अशात नांदेड (Nanded) जिल्ह्यात गेल्या 2-3 दिवसात पावसाने सर्वदूर जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करीत आहे. जिल्ह्यातील उमरी, भोकर, नांदेड, देगलूर, मुखेड परिसरात तर चांगल्या पावसामुळे आनंदाचे वातावरण आहे. तर नांदेड शहर व तालुका परिसरातही गेल्या 2 दिवसांपासून पूर्ण पावसाळी वातावरण आहे. दोन दिवसांपासून सूर्यदर्शनही झाले नाही. तर 18 जुलै रोजी मंगळवारी दुपारनंतर मात्र नांदेड परिसरात पावसाने जोर धरला.
किनवट : तालुक्यात मंगळवारी दिवसभर व सायंकाळी उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरुच होता. मात्र अजून मोठा पाऊस गरजेचा आहे. तालुक्यातील नदी, नाले आजही कोरडेच आहेत. तालुक्यात कधी अतिवृष्टी, मुसळधार, दमदार पाऊस झालाच नाही. तर 17 जुलैला सायंकाळी किनवट तालुक्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरुच होता.
उमरी : तालुक्यात मंगळवारी दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. दिवसभर संततधार पाऊस चालू होता. मंगळवारी आठवडी बाजार असल्याने ग्रामीण भागातून अनेक नागरिक बाजारासाठी उमरी शहरात आले होते. शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचले होते.
भोकर : तालुक्यात मंगळवारी सकाळ पासूनच तालुक्यात पाऊस पडत असल्याने बळीराजा सुखावला आहे. पेरणीनंतर मंगळवारी दिवसभर पाऊस पडल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे. दिवसभर झालेल्या पावसामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. पिकांसाठी पाऊस समाधानकारक झाल्याचे बोलल्या जात आहे. पावसामुळे पिकांना बळ मिळाले आहे. दोन दिवसापासून सुर्यदर्शन नव्हते.
देगलूर : तालुक्यात सोमवारी रात्री व मंगळवारी दुपारपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. दोन दिवसापासून सुर्यदर्शन झाले नाही. सोमवारी रात्री 9 वाजता चालू झालेला पाऊस मंगळवारी सायंकाळपर्यंत चालूच होता.
मुखेड : तालुक्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र रिमझिम पाऊस कोसळत आहे. मंगळवारी पावसाचा जोर काहीसा वाढल्याने शेतकरी काही अंशी समाधान व्यक्त करीत आहेत. खरीप हंगामावरील दुबार पेरणीचे संकट टळल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा कायम आहे.
'एसडीआरएफचे' जवान तळ ठोकून
पावसाळ्यातील पूरस्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या आपत्तींचा सामना करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) एक तुकडी नांदेड जिल्ह्यात दाखल झाली आहे. संपूर्ण मराठवाड्यासाठी असलेली ही तुकडी दीड महिना नांदेड येथे वास्तव्याला राहणार आहे. जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, मांजरा, आसना, लेंडी, कयाधू, मन्याड या प्रमुख नद्या असून, पावसाळ्यामध्ये नद्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होते. जिल्ह्यात 337 पूर प्रवण गावे आहेत. त्यामुळे आपत्तींचा सामना करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) एक तुकडी जिल्ह्यात मुक्कामी आहे. ज्यात 33 जवानांचा समावेश आहे. दीड महिना थांबणार आगामी पुराचा धोका लक्षात घेऊन मराठवाडा क्षेत्रासाठी एसडीआरएफची धुळे येथील एक तुकडी नांदेडमध्ये तैनात केली आहे. 15 जुलै ते 31 ऑगस्ट या काळात 33 जवानांची तुकडी वास्तव्यास राहणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Washim: नांदेड-अकोला महामार्गावर वाशिमजवळ चिखलाचं साम्राज्य; पाच वर्षांपासून वाहनधारक त्रस्त