Nanded News : शेतकरी नवराच हवा... उच्च शिक्षित तरुणीचा हट्ट; अखेर वडिलांनी मुलीची इच्छा पूर्ण केली
Nanded News : तीन शाखांत पदवीधर, त्यानंतर पीएच.डी.चं शिक्षण सुरू असताना व एका खासगी बँकेत नोकरी करणाऱ्या मुलीचा शेतकरी मुलासह लग्न ठरला.
Nanded News : मागील काही वर्षांत शेतकरी पुत्रांना मुली मिळत नसल्याचा सतत आरोप होत आहे. एवढंच काय तर अनेक ठिकाणी मुली मिळत नसल्यानं आंदोलन देखील करण्यात आलं आहे. ग्रामीण भागातील सुशिक्षित मुलगी देखील शेतकरी जोडीदार नको, अशी अट घालते. शेती करणाऱ्यापेक्षा नोकरदार मुलगा असावा, अशी अपेक्षा बहुतांश मुलीच्या पालकांची पाहायला मिळत आहे. एकीकडे अशी सर्व परिस्थिती असताना नांदेड (Nanded) जिल्ह्यातील एका उच्चशिक्षित आणि नोकरी करणाऱ्या मुलीनं मला शेतकरी नवराच हवा असल्याचा हट्ट धरला आहे. शेवटी मुलीच्या हट्टापुढे आईवडिलांचंही काही चालेना आणि त्यांनी मुलीची इच्छा पूर्ण केली.
अलीकडे आईवडील आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून, जावई नोकरीवाला शेधतात. मुलगी डॉक्टर असेल तर मुलगा डॉक्टरच शोधतात. तसेच शिक्षक, इंजिनिअर, बँकेत, पोलीस आदी क्षेत्रांत मुली नोकरी करत असल्यास, त्याच क्षेत्रात नोकरी करणारा मुलगा शोधला जातो. यामुळे ग्रामीण भागांत शेतकरी मुलांना सहसा मुलींचं स्थळ भेटणं अवघड झालं आहे. महानगरात राहण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुली शक्यतो शहरी मुलांसोबत लग्न करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागांतील शेतकऱ्यांच्या मुलांना मुली देण्यास कोणी तयार नाही. परंतु, तीन शाखांत पदवीधर, त्यानंतर पीएच.डी.चे शिक्षण सुरू असताना आणि एका खासगी बँकेत नोकरी करणाऱ्या नांदेडच्या साप्ती गावातील वैष्णवी दिंगबरराव कदम हिनं मात्र आयुष्याचा जोडीदार म्हणून मला शेतकरीच नवरा पाहिजे, असा वडिलांकडे हट्ट धरला आहे. तर तिचा हा हट्ट वडिलांनीही पूर्ण केला आहे.
शेतकरीच नवराच हवा...
उच्चशिक्षित असलेल्या वैष्णवीच लग्नाचं वय झाल्यावर तिच्या पालकांकडून तिच्यासाठी जोडीदाराचा शोध घेतला जात होता. मुलीचे एवढ शिक्षण झाले, तसेच ती बँकेत नोकरीला असल्याने आपला जावाई देखील नोकरीवाला असावा म्हणून त्यांच्याकडून मुलाचा शोध सुरु होता. पण आपला जोडीदार शेतकरीच असावा असा हट्ट वैष्णवीने धरला. लग्न करेल तर फक्त शेतकरी मुलासोबतच अशी भूमिका तिने घेतली. त्यामुळे शेवटी तिची इच्छा पालकांनी पूर्ण केली. 9 जुलै रोजी एका शेतकरी मुलासोबत वैष्णवीचा विवाह पार पडणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील शेतकरीपुत्र नितीन याच्याशी वैष्णवीचा विवाह होणार आहे. वैष्णवीच्या या भुमिकेचं सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या या लग्नाची परिसरात चर्चा देखील होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :