(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded News: खराब रस्त्यामुळे धावत्या एसटीचा दरवाजा उघडल्याने प्रवाशाचा मृत्यू, कंधार तालुक्यातील शेल्लाळी फाटा येथील घटना
खराब रस्त्यामुळे महामंडळाच्या धावत्या बसचे दाराचे हूक तुटून तो उघडल्या गेल्याने एका प्रवाशाचा खाली पडून मृत्यू झाला. ही घटना कंधार तालुक्यातील शेल्लाळी फाटा येथे घडली आहे.
नांदेड : नांदेड (Nanded News) जिल्ह्यातील पांगरी गावाला तालुक्याचे ठिकाण असलेल्या कंधारला जोडणाऱ्या रस्त्याचे काम रखडले आहे. विशेषतः पावसाळा जवळ आला तरी या मार्गावरील पुलाची कामे अर्धवट असल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. खराब रस्त्यामुळे महामंडळाच्या धावत्या बसचे दाराचे हूक तुटून तो उघडल्या गेल्याने एका प्रवाशाचा खाली पडून मृत्यू झाला. ही घटना कंधार तालुक्यातील शेल्लाळी फाटा येथे रविवारी (18 जून) रोजी सकाळी घडली. लक्ष्मण शेषेराव गायकवाड (40) असे मृताचे नाव आहे.
आंबुलगा येथून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शेल्लाळी फाटाजवळ मुखेड आगाराची बस क्र. (एम.एच.20 बी. आय. 1618) ही कंधारहून मुखेडकडे प्रवासी घेऊन जात होती. सदरच्या बसमधून कल्हाळी येथील प्रवासी लक्ष्मण शेषेराव गायकवाड (वय 40, वीट कामगार) हे सावरगाव (नि.) येथे सासरवाडीला जात होते. दरम्यान, आंबुलागा गावच्या पुढे ते सावरगावपर्यंत रस्त्याचे काम रखडले आहे. तो रस्ता सुरू झाला की चढ व घाट वळण रस्त्यांवर शेल्लाळी पाटीच्या जवळ धावत्या एसटीचा दरवाजा उघडला. दारालगत उभे असलेले गायकवाड धावत्या बसमधून खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यु झाला, असे बसमधील काही प्रवाशांनी सांगीतले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, चार बहिणी, दोन भाऊ, आई असा मोठा परिवार आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरू होती. पुढील तपास पोलीस निरीक्षक आर.एस. पडवळ हे करत आहेत.
चार मुलीच्या डोक्यावरुन छत्र हरपले
मृत लक्ष्मण शेषेराव गायकवाड यांना चार मुली आहेत. मोठी मुलगी आठवीला आहे तर तीन लहान आहेत. वीट भट्टीवर रोजंदारीवर व मिळेल ते रोजगार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. आंबुलगा येथील साडूभाऊ यांना भेटून सावरगाव येथे सासरवाडीला जात होते. पण काळाने घात घडवून आणला अन् चार मुलीच्या डोक्यावरुन वडीलाच्या निधनाने छत्र हरपले.