(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डॉक्टर लेकीला कुटुंबियांनी क्रूरपणे संपवलं; शेतात जाळलं, नांगरणी केली अन् कांदाही लावला, हत्येचा उलगडा झाला कसा?
Crime News Update : ती गेली तरी कुठे? तिचा फोन का लागत नाही? असे प्रश्न त्यांना पडले... अखेर तिच्या एक मैत्रिणीनं थेट जिल्हा पोलीस मुख्यालय गाठलं.
Nanded Latest Crime News Update : इभ्रतीसाठी डॉक्टर मुलीला कुटुंबियांनी संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संतापजनक बाब म्हणजे, वडिलांसह भाऊ, मामा, चुलतभाऊ यांनी हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. मुलीचं प्रेमप्रकरण समजल्यानंतर तिची हत्या केली. शेतातच तिचा मृतदेह जाळला, त्यात नांगरणी केली अन् लागवड केली... दोन हजार लोकसंख्येच्या गावाला याचा सुगावाही लागला नाही.. पण मुलीच्या मित्रांनी आवाज उठवल्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आले... या घटनेमुळे नांदेड हादरलं. 22 जानेवारी 2023 रोजी कुटुंबियांनी लेकीला क्रूरपणे संपवलं... अन् 26 जानेवारी रोजी हे हत्याकांड उघडकीस आले.. हा संपूर्ण घटनाक्रम कसा होता पाहूयात.
नांदेड (Nanded) जिल्ह्यातील महीपाल पिंपरी येथे एका डॉक्टर तरुणीची हत्या होते. तिचेच कुटुंबीय तिला घरीच संपवतात. मग आपल्याच शेतात नेऊन तिला जाळून टाकतात. मग त्या शेतामध्ये नांगरणी करुन कांदा लागवड करतात. दोन हजार लोकवस्ती असलेल्या गावाला या घटनेचा सुगावा लागतही नाही? हे कसं काय शक्य आहे? डॉक्टर मुलगी ज्या दिवसापासून बेपत्ता झाली... तेव्हापासून तिच्या वर्गमित्रांना संशय येऊ लागला... ती गेली तरी कुठे? तिचा फोन का लागत नाही? असे प्रश्न त्यांना पडले... अखेर तिच्या एका मैत्रिणीनं थेट जिल्हा पोलीस मुख्यालय गाठलं.. तिथल्या महिला सुरक्षा कक्षेकडे तिने तक्रार दिली... आणि तिथूनच खऱ्या अर्थाने तपासाची चक्रे फिरली.
जिल्हा पोलीस मुख्यालयाकडून या घटनेबाबत विचारणा झाल्यानंतर स्थानिक लिंबगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी खडबडून जागे झाले झाले. त्यांनी गावातल्या पोलीस पाटील भारत कदम यांना पाचारण केलं. त्यानंतर सापळा रचला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलीच्या वडिलांना ताब्यात घेतलं. मुलीच्या वडिलांना पहिल्यांदा याबाबत काही माहित नसल्याचं सांगितलं. पण पोलिसी खाक्या दाखवताच वडिलांनी हत्येची कबुली दिली. इतकंच नाही... तर या गुन्ह्यात सामील असलेल्या मुलीचा भाऊ, मामा, चुलतभाऊ यांचीही नावं सांगितली. पोलिसांनी तात्काळ मुलीच्या वडिलांसह पाच जणांवर हत्येचा गुन्हाही दाखल केला. नात्यातील मुलाशी प्रेमसंबध असल्यामुळं ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पण प्रश्न असा आहे की, जर मृत मुलीच्या मित्र-मैत्रिणींनी आवाज उठवलाच नसता तर हा खून पचला असता का? कितीही कायदे करा...मसुदे बनवा, महिला सुरक्षेच्या गप्पा मारा. पण जोपर्यंत आपल्या पोटच्या लेकीपेक्षा आपल्या कुटुंबाची इभ्रत जास्त महत्त्वाची वाटत असेल तर आपण माणूस म्हणून घेण्याच्याच लायकीचे नाही आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे, अशा प्रतिक्रिया सध्या सर्वसामान्यांकडून येत आहेत.