Nanded News : धक्कादायक! नांदेडच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात उंदरांचं साम्राज्य, चक्क महिला रुग्णाच्या अंगावर खेळतोय उंदीर; आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा
Nanded News : नांदेडच्या कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. शासकीय ग्रामीण रुग्णालयात उंदरांचं साम्राज्य पाहायळा मिळतंय.

Nanded News : नांदेडच्या कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात (Hospital) एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. शासकीय ग्रामीण रुग्णालयात उंदरांचं साम्राज्य पाहायळा मिळतंय. धक्कादायक बाब म्हणजे एका महिला रुग्णावर चक्क उंदीर खेळत असल्याचा व्हिडीओ समोर आलाय. महिला रुग्ण झोपलेली असताना तिच्या अंगावर उंदीर बिनधास्तपणे फिरताना दिसत आहे. ही घटना गंभीर असून काही दिवसांपूर्वीच नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एका वयोवृद्ध रुग्णाच्या पायाला उंदराने कुरतडल्याचा प्रकार समोर आला होता. आता यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यावर काय कारवाई करणार? असा सवाल रुग्ण विचारत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शासकीय रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात उंदराने रुग्णाचा पाय कुरतडल्याचीह धक्कादायक घटना तीन दिवसापूर्वीच उजेडात आली होती. त्यानंतर आमदार आनंद बोंढारकर यांनी त्या ठिकाणी भेट देत रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचे म्हणत रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते.
आरोग्यमंत्री काय कारवाई करणार?
त्यातच आता नांदेड कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. शासकीय रुग्णालयात उंदरांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेच्या अंगावर चक्क उंदीर खेळताना दिसत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यावर काय कारवाई करणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा समोर
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी नांदेडमधील श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका रुग्णाच्या पायाला उंदराने कुरतडल्याची घटना घडली होती. 63 वर्षीय रमेश यन्नावार यांना मधुमेह असून, त्यांच्या पायावरील शस्त्रक्रियेसाठी 20 जुलै रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 21 जुलैच्या पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास त्यांच्या पायाला उंदीर कुरतडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जाग येताच उंदीर पळून गेला. मात्र, त्यानंतरही तो उंदीर शस्त्रक्रिया विभागात फिरत असल्याचे पाहायला मिळाले. रुग्णाच्या नातेवाईकाने या प्रकाराचा व्हिडीओ मोबाईलमध्ये टिपला होता. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले होते की, आम्ही पेस्ट कंट्रोल केलेले आहे. यापुढे अशी काही घटना घडणार नाही. मात्र आता कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात उंदरांचे साम्राज्य दिसून आल्याने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
आणखी वाचा
























