Nanded Crime News: सासरची मंडळी बाहेर गेल्यावर बॉयफ्रेंडला बोलावलं, नांदेडमध्ये विवाहबाह्य संबंधांचा भयानक अंत, बापाने लेकीसह प्रियकराला संपवलं
Nanded Crime News: लग्नानंतर लपूनछपून या दोघांच्या गाठीभेटी, बोलणं सुरूच होतं. त्यांच्या प्रेमाला मुलीच्या आई-वडिलांचा विरोध होता.

नांदेड : जन्मदात्याने आपल्या विवाहित मुलीसह तिच्या प्रियकराला मारहाण करून, जीव घेऊन, हात-पाय बांधून विहिरीत ढकलून दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील गोळेगाव, (ता. उमरी) येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर वडिलांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन घटनेची माहिती दिली आहे, मुलीचा मृतदेह आधी हाती लागला, तर मुलाचा मृतदेह सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास विहिरीतून बाहेर काढला.
लपूनछपून या दोघांच्या गाठीभेटी, बोलणं सुरूच
मिळालेल्या माहितीनुसार संजीवनी कमळे (19, रा. गोळेगाव) व लखन बालाजी भंडारे (19, रा. बोरजुनी) असे या घटनेतील मयत तरुण व तरुणीचे नाव आहे. बोरजुनी येथील मूळचे रहिवासी असलेल्या या दोघांचे गेल्या काही वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू होते. गेल्या वर्षी संजीवनी हिचा विवाह गोळेगाव येथील एका तरुणासोबत झाला होता. तरीही लपूनछपून या दोघांच्या गाठीभेटी, बोलणं सुरूच होतं. त्यांच्या प्रेमाला मुलीच्या आई-वडिलांचा विरोध होता. रात्री उशीरा दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. मयत तरुणीचे वडील, काका, पती, सासू-सासरे आदींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
दोघांनाही नको त्या अवस्थेत पाहिलं
वर्षभरापूर्वी मुलीचा विवाह झाला होता, मात्र तरीही तिचं आणि प्रियकरांचं बोलणं सुरू होतं, महिन्यांपूर्वीच मुलाची समजूत काढून मुलीला भेटण्यास मज्जाव करण्याचा प्रयत्न झाला. सोमवारी संजीवनीच्या सासरचे मंडळी बाहेर गेल्याने संजीवनी हिने आपल्या प्रियकराला घरी बोलवले. अचानक घरी परतलेल्या पती आणि सासरच्या मंडळींनी संजीवनी आणि तिच्या प्रियकराला नको त्या अवस्थेत बघितले. त्यानंतर संजीवनीच्या पतीने सासऱ्यांना फोन करून बोलावले आणि मुलीला घरी घेऊन जाण्यास सांगितले.
चाळीस फूट खोल असलेल्या विहिरीत दोघांचे मृतदेह
मुलीचे वडील, काका आणि आजोबा हे तिघे जण मुलीच्या सासरी गोळेगावला पोहचले. गोळेगाव आणि बोरजुन्नी हे आजू बाजूला गावं आहे. आरोपींनी मुलीला आणि तिच्या प्रियकराला घेऊन जातं असताना करकाळा शिवारात दोघांना मारहाण करून त्यांची हत्या केली, त्यानंतर चाळीस फूट खोल असलेल्या विहिरीत दोघांचे मृतदेह फेकून दिले. घटनेनंतर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मुलीचे वडिल मारोती सुरणे हे उमरी पोलीस ठाण्यात पोहचले आणि मी मुलीला आणि तिच्या प्रियकराला मारून विहरीत फेकलं आहे अशी माहिती दिली. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
























