(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आंदोलनाची धग कायम, बस पेटवल्याने नांदेड जिल्ह्यात सकाळपासून अंतर्गत बससेवा बंद; प्रवाशांचे हाल
Nanded : अचानकपणे घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होतांना पाहायला मिळत आहे.
नांदेड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सध्या राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाची धग नांदेड (Nanded) जिल्ह्यात कायम आहे. जिल्हयात गेल्या दोन दिवसात एक एसटी बस (ST Bus) जाळण्यात आली असून, दुसऱ्या एका बसवर दगडफेक करण्यात आली. दोन दिवसात या दोन घटना समोर आल्याने आज नांदेड जिल्ह्यात जिल्हाअंतर्गत एसटी बस सेवा सकाळपासुन बंद ठेवण्यात आली आहे. इतर आगारातून आणि विभागातून ज्या गाड्या रात्री मुक्कामी आल्या होत्या त्यांना सकाळी सोडण्यात आले आहे. मात्र, नांदेड आगार आणि जिल्ह्यांतील डेपोमधील एसटी बसेस सोडण्यात आलेल्या नाहीत. अचानकपणे घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होतांना पाहायला मिळत आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सध्या राज्यभर आंदोलन सुरु आहे. नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी असेच आंदोलन होतांना दिसत आहे. दरम्यान, नांदेड मालेगाव रस्त्यावर अज्ञात इसमांनी बस पेटवून दिल्याची घटना परवा (12 सप्टेंबर) रोजी समोर आली होती. यावेळी बसमध्ये 30 ते 40 प्रवासी होते, मात्र प्रवासी सुखरूप बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. हा प्रकार आरक्षणाच्या मागणीसाठी केला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर, पोलिसांत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 सप्टेंबरला पुन्हा एकदा एका बसवर दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे गंभीर दाखल राज्य परिवहन मंडळाने घेतली असून, आज नांदेड जिल्ह्यातील अंर्तगत बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
अज्ञात इसमांनी दिली बस पेटवून
वसमत ते नांदेड जाणारी बस (एम.एच. 20 बी.एल. 1146) नेहमीप्रमाणे 12 सप्टेंबर रोजी मंगळवारी रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास वसमत ते नांदेड मार्गे जात होती. दरम्यान, अर्धापूर हद्दीतील मालेगाव ते कासारखेडा रस्त्याच्या दरम्यान मध्यभागी असलेल्या पुलाजवळ अज्ञात इसमांनी या बसवर दगडफेक केली. त्यामुळे घाबरलेले प्रवासी बाहेर पडले. त्यानंतर अज्ञात इसमांनी ती बस पेटवून दिली. दरम्यान, याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक व अग्नीशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. यावेळी परिसरातील नागरिकांच्या मदतीने बस आग विझवण्यात आली. बस पेटवून देण्याचा प्रकार हा मराठा आरक्षणासाठी असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Pune News : मराठा सकल मोर्चाकडून पुणे बंदची हाक; औंध, बाणेर, बालेवाडी परिसरात शुकशुकाट