(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded Rain: पुराच्या पाण्यातून एकाला वाचवण्यासाठी गेलेले दोघेही अडकले, अन् जेसीबीने तिघांना वाचवले
Nanded Rain Updates: पुराच्या पाण्यात अडकलेल्या एकाला गेलेले दोघेजणही अडकले. मात्र, जेसीबीच्या मदतीने तिघांची सुटका करण्यात आली.
Nanded Rain Updates: नांदेड जिल्ह्यात (Nanded News) बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदी, नाल्यांना पुर आला आहे. शेतात शिल्लक पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. तर, दुसरीकडे काही घटनाही घडल्या आहेत. पुरात अडकलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी दोघे जण गेले. मात्र, तेदेखील पाण्यात अडकल्याने अखेर जेसीबीच्या मदतीने तिघांची सुखरुप सुटका करण्यात आली.
नांदेड जिल्हयातील किनवट तालुक्यातील ईस्लापुर गावात आज ढगफुटीसारखा पाऊस झाला. त्याच्या परिणामी गावात पूर आला. पुरात गावातील एक व्यक्ती अडकून पडला. त्याला वाचवण्यासाठी तलाठी आणि ग्रामसेवक गेले. पण पाण्याचा प्रवाह वाढल्याने तिघेही अडकून पडले. शेवटी जेसीबीच्या सहायाने तिघांची सुटका करण्यात आली.
जिल्हयात मुसळधार पाऊस; दोन जण गेले वाहून
किनवट मधील बेलोरी नाल्यावरून एक व मुखेड तलुक्यातील राजूरा येथून एक असे दोन जण वाहून गेले आहेत. प्रदिप साहेबराव गोयाळे (वय 25) व अशोक पोशटी दोनेवार ( वय 40) असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहेत. तसेच अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बेल्लोरी येथील नाल्यावरून अशोक कोशटटी दोनेवार (वय 40) पुरात वाहून गेला आहे. मुखेड तालुक्यात रात्रीपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. राजूरा येथील प्रदिप साहेबराव गोयाळे (वय२५) हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. त्याचा मृतदेह सापडला आहे. उमरी-मुदखेड रस्ता रेल्वे पुलाच्या खाली पाणी असल्यामुळे मागील आठ दिवसापासून बंद आहे. हिमायतनगर ते वडगांव व हिमायतनगर ते वडगांव तांडा दोन गावाचा संपर्क तुटला तरी दुसरा मार्ग गणेशवाडी जिरोणा या मार्गाने हिमायतनगरसाठी वाहतूक चालू आहे. नांदेड तालुक्यात रात्रीपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. धर्माबाद तालुक्यातील पाटोदा-थडी, माष्टी, मोकळी या गावांचा संपर्क तुटला आहे. बिलोली तालुक्यातील कान्हाळा, नागणी, माचनुर, हरनाळी, कोटग्याळ , दौलापूर गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच टाकळी खु. येथील मन्याड नदी भरून वाहत असल्याने हरनाळी गावात पाणी शिरले आहे.
धर्माबादमध्ये 60 ते 70 कुटुंबाचे दोन बसेसे द्वारे स्थलांतर
धर्माबाद तालुक्यातील बनाळी येथे अति पावसामुळे 60 ते 70 कुटुंबाचे दोन बसेस द्वारे धर्माबाद येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतर करण्यात आलेले आहे. उमरी तालुक्यात बेलदरा ते उमरी रस्ता बंद आहे. मौजा अब्दुलापूर ते शिरूर येथील रस्ता बंद झाला आहे, असे जिल्हा प्रशासनाने काळविले आहे.