Nanded: नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील गुंठेवारी विभागाला आग, महत्वाच्या संचिका जळून खाक
Nanded Fire News: आगीची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे (Fire Department) बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.
Nanded Fire News: नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील (Nanded Collector Office) बचत भवनात असलेल्या गुंठेवारी विभागाला काल मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास अचानक आग (Fire) लागली. ज्यात गुंठेवारीच्या अनेक महत्त्वाच्या रेकॉर्ड असलेल्या संचिका जळून खाक झाल्या आहेत.आगीची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे (Fire Department) बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यामुळे आगीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यात यश आलेय.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी मध्यरात्री अचानक आग लागली होती. बचत भवनात असलेल्या गुंठेवारी विभागात ही लागली होती. मात्र रात्रीचा वेळ असल्याने आग लागल्याचे लवकर लक्षात आले नाही. पण आगीचा भडका होताच कार्यालयात असलेल्या सुरक्षारक्षक यांना आग लागल्याचे समजले. त्यामुळे याची माहिती तात्काळ अग्निशमन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत आग नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यंत महत्वाच्या अनेक संचिका जळून खाक झाल्या होत्या.
संचिकांची सॉफ्ट कॉपी सुरक्षित...
दरम्यान गुंठेवारी विभागातील आग आटोक्यात आली नसती व जराही विलंब झाला असता तर आगीने संपूर्ण बचत भवन आपल्या कवेत घेतले असते. अशी माहिती अग्निशमन विभागाने दिलीय. आगीच्या घटनेनंतर घटनास्थळी जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच गुंठेवारी विभागात लागलेल्या आगीत अंशतः नुकसान झाले असून, यातील सर्व संचिकांची सॉफ्ट कॉपी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गुंठेवारी विभागाने सुरक्षित ठेवली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राऊत यांनी दिलीय.
घातपाताचा संशय...
या आगीमागील कारण स्पष्ट झाले नाही. मात्र घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. गुंठेवारी कार्यालयात अडवणूक करून, बोगस पावत्या देऊन अव्वाच्या सव्वा रुपये घेतले जात असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. तसेच महापालिकेतील बोगस सह्या करून गुंठेवरी केल्याचे प्रकरण ताजे असताना व या अगोदर गुंठेवारी, बोगस एन. ए. लेआऊट प्रकरणी पोलिसात गुन्हे दाखल असताना ही आगीची घटना घडलीय. गेल्या काही महिन्यापासून शहरात गुंठेवारच्या संचिकांचा घोटाळा व या घोटाळ्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी तर ही आग लावली गेली नाही ना, अशी दाट शंकाही व्यक्त केली जात आहे. दरम्यान या आग प्रकरणी वाजीराबाद पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केलाय.
Nanded: नांदेड झेडपीत एका झटक्यात 40 ग्रामसेवकांचं निलंबन, वातावरण तापलं; चौकशी समितीची स्थापना