आधी भावजींनी काँग्रेसची साथ सोडली, आता अशोक चव्हाणांचे दाजीही म्हणतात...
Ashok Chavan : अशोक चव्हाण यांचे सख्खे दाजी आणि नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर नेमकी काय भूमिका घेणार असा प्रश्न विचारला जात आहे.
नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसचा (Congress) हात सोडून भाजपमध्ये (BJP) जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात चव्हाण यांना मानणारे अनेक नेतेमंडळी सुद्धा भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांचे सख्खे दाजी आणि नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर (Bhaskar Rao Patil Khatgaonkar) नेमकी काय भूमिका घेणार असा प्रश्न विचारला जात असतानाच, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर आपली काय भूमिका असणार आहे? यावर बोलतांना खतगांवकर म्हणाले की, “अशोक चव्हाण म्हणतील तो निर्णय आणि तीच पूर्वदिशा असणार असल्याचे" खतगांवकर म्हणाले. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांचे दाजी भास्करराव पाटील खतगांवकर देखील लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी अशोक चव्हाणांनी केली होती चर्चा...
दरम्यान अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर बोलतांना भास्करराव पाटील खतगांवकर म्हणाले की, "अशोक चव्हाण यांनी जो पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, तो योग्यच आहे. भाजपमध्ये जाण्याच्या त्यांच्या निर्णयापूर्वी या विषयावर आमच्यात चर्चा देखील झाली होती. मराठवाड्यातील विकासाचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे असे माझ स्पष्ट मत मी त्यावेळी व्यक्त केले होते. मागील 10 वर्षात विदर्भात नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार असतील, ज्या वेगाने ते त्यांच्या विभागातील प्रश्न सोडवत आहेत. त्या गतीने मराठवाड्यातील प्रश्न सुटत नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये जाण्याच्या निर्णय घ्या असे मी म्हणालो होतो,” असे खतगांवकर म्हणाले.
मराठवाड्याच्या विकासाठी भाजपमध्ये जायला पाहिजे
पुढे बोलतांना ते म्हणाले की, "अशोक चव्हाण यांच्यासोबत तीन दिवसांपूर्वी देखील चर्चा झाली. त्यावेळी देखील त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर असून, काय निर्णय घेऊ असे विचारले होते. त्यावेळी सुद्धा मी त्यांना मराठवाड्याच्या विकासाठी भाजपमध्ये जायला पाहिजे असे सांगितले होते. यावर आमची बरीच चर्चा झाली. अशोक चव्हाण हे दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. सतत सत्तेत असतांना ते मंत्री देखील राहिले. त्यामुळे आता त्यांचे वैयक्तिक काही स्वार्थ नाहीत. मात्र, आज आम्हाला नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासाचे अनेक प्रश्न सोडवायचे आहेत," असे खतगांवकर म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :
पहिल्याच पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण अडखळले, फडणवीसांसह सर्वजण खळखळून हसले!