(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अशोक चव्हाणांच्या पत्नी आणि मुलीला मराठा समाजाचा घेराव; आरक्षण दिल्यानंतरच गावात पाय ठेवा, आंदोलकांचा इशारा
Maratha Reservation : जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावत नाही तोपर्यंत गावात येऊ नका असा इशारा मराठा समाजाने दिला आहे.
नांदेड : भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण आणि पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण यांना पुन्हा एकदा मराठा समाजाने घेराव घालत एक मराठा लाख मराठा घोषणा दिल्या.
माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण आणि पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण यांना पुन्हा एकदा मराठा समाजाच्या रोषाला समोर जावं लागलं आहे. आमच्या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा आणि मगच गावात पाय ठेवा असा इशारा मराठा समाजातील आंदोलकांनी दिला. नांदेडमधील देगाव आणि धामदरी या गावात हा प्रकार घडला आहे.
नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील देगाव (कुऱ्हाडा) आणि धामदरी या गावी श्रीजया चव्हाण या नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी गेल्या होत्या. परंतु त्यांना मराठा समाजाच्या तरुणांनी घेराव घातला. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही तो पर्यंत गावात येऊ नका अशी भूमिका यावेळी मराठा समाजाने घेतली. यावेळी एक मराठा लाख मराठा आशा घोषणा देण्यात आल्या. आमचा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा, तेव्हाच गावात पाय ठेवा असा इशारा या गावकऱ्यांनी दिला.
अमिता चव्हाण यांना आरक्षणाच्या मुद्द्यावरून सवाल
या आधीही अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना मराठा समाजाच्या आंदोलकांनी घेराव घातला होता. गणपूर गावात भेटीगाठीसाठी गेलेल्या अमिता चव्हाण यांना मराठा आरक्षणावर जाब विचारण्यात आला. आता तुम्ही भाजपात आहात , मराठा आरक्षणासाठी तुमची भूमिका काय असा सवाल त्यांनी विचारला होता.
अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली. त्यानंतर भोकर विधानसभेसाठी त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या तयारी करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी अनेक गावांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मात्र त्यांना अनेकदा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे.
अशोक चव्हाणांनाचीही अडचण
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. भाजपकडून ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीला विरोध असून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका भाजपकडून सातत्याने मांडण्यात आली आहे. त्याला नांदेडमधील मराठा समाजाचा विरोध आहे.
लोकसभा निवडणुकीतही फटका
लोकसभा निवडणुकीतही मराठा आरक्षणाचा मुद्दा अशोक चव्हाण यांच्या स्थानिक मतदारसंघ असलेल्या नांदेडमध्ये गाजला होता. या निवडणुकीत काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांनी बाजी मारली होती. 2014 मध्ये प्रतापराव चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. मात्र, या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण सोबत होते, तरिही प्रतापराव चिखलीकर यांना पराभवाला सामोरे जावे लागेल.
मराठा आरक्षणासाठी आपण गप्प का?, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे असे प्रश्न करत मराठा बांधवांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली होती. यावेळी अशोक चव्हाण यांनी काही वेळ आपली सभा थांबवून त्यांच्याशी संवाद साधला होता.