(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नायलॉन मांजामुळे जीव गमावलेल्यांबद्दल राज्य सरकारचं धोरण काय ? हायकोर्टाची विचारणा...
नायलॉन मांजामुळे काही मृत्यू झाले, तर काहींवर शस्त्रक्रिया करण्यात आली, या सर्व पीडितांना भरपाई देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असून सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी विचारणा हायकोर्टाने केली आहे.
Nagpur News : नायलॉन मांजामुळे मृत्यू आणि जखमी झालेल्या व्यक्तींना भरपाई देण्याविषयी राज्य सरकारचे काय धोरण आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर (Bombay High Court Nagpur) खंडपीठाने बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना केली आणि यावर एक आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने 11 जुलै 2017 रोजी आदेश जारी करून पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग, विक्री आणि आयातीवर पूर्णपणे बंदी आणली आहे. असे असताना यावर्षी पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा सर्रास उपयोग करण्यात आला. नायलॉन मांजामुळे एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. अनेकजण गंभीर जखमी झाले. काहीजणांवर शस्त्रक्रिया करावी लागली. पीडितांना भरपाई देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे राज्य सरकारने (Maharashtra Government) यासंदर्भात भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे, असे प्रकरणातील न्यायालय मित्र अॅड. देवेंद्र चव्हाण यांनी सुनावणीदरम्यान सांगितले. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता वरील निर्देश दिले.
नागरिकांकडील मांजाची विल्हेवाट लावा
शहरामध्ये अनेकांच्या घरी नायलॉन मांजा आहे. नागरिकांना आवाहन करून तो मांजा बाहेर काढण्यासाठी व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक पावले उचला, असे न्यायालयाने महानगरपालिकेला सांगितले. मनपातर्फे अॅड. जेमिनी कासट यांनी युक्तिवाद केला.
पर्यावरण मंत्रालयाला प्रतिवादी केले
नायलॉन मांजा पर्यावरणासाठीही धोकादायक असल्यामुळे या प्रकरणात राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाला प्रतिवादी करण्यात आले. तसेच मंत्रालयाचे प्रधान सचिवांना नोटीस बजावून यावर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.
नायलॉन मांजा विक्रेत्यांवर मोक्का लावण्याची मागणी
नायलॉन मांजामुळे (Banned nylon manja) जखमी झालेल्या काही मुलांना रुग्णालयात भरती करण्याच्या अनेक घटना नागपुरात घडल्या आहेत. त्यामुळे या जीवघेण्या मांजा विक्री करणाऱ्यांविरोधात आम आदमी पार्टी आक्रमक झाली आहे. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा, तसेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशा मागणीचे निवेदन आप पार्टीने परिमंडळ तीनच्या पोलिस उपायुक्तांना (Nagpur Police) दिले होते.
चिमुकलीला लागले 26 टाके
फारुख नगरमधील पाच वर्षीय शबनाज बेगम शाळेतून घरी आली आणि त्यानंतर ती घराशेजारी खेळत होती. बाजूच्या दुसऱ्या इमारतीवर मुले पतंग उडवत होते. दरम्यान एक पतंग कटली. त्या पतंगाचा मांजा पकडण्यासाठी परिसरातील मुलांनी धडपड सुरु केली. एका मुलाच्या हाती मांजा लागल्यानंतर त्याने, तो मांजा ओढण्यास सुरुवात केली. दरम्यान मांजा एका मुलीच्या गळ्याला घासून गेल्याने तिच्या गळ्याला खोलवर जखम झाली. या घटनेत रक्तबंबाळ झालेल्या चिमुकलीला आजूबाजूच्या लोकांनी लगेच रुग्णालयात दाखल केले. यात मुलीच्या मानेला 26 टाके घालावे लागले होते.
ही बातमी देखील वाचा...