(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांमुळे विदर्भातील व्याघ्र प्रकल्प, पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल
Nagpur News: दिवाळीपूर्वीच अनेकांनी जंगल सफारीची बुकिंग केल्यानं ऐटदार आणि रुबाबदार वाघ बघण्यासाठी पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचं चित्र आहे.
Maharashtra News: दिवाळीच्या (Diwali 2023) सलग सुट्यामुळे महाराष्ट्रासह देशातील पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीनं फुलून गेली आहेत. अशातच टायगर कॅपिटल ऑफ इंडिया (Tiger Capital of India) अशी ओळख असलेल्या नागपूर (Nagpur) आणि विदर्भातील सर्व व्याघ्र प्रकल्प (Tiger Project) वन्यजीव प्रेमीच्या गर्दीनं हाउसफुल्ल झाले आहेत. दिवाळीपूर्वीच अनेकांनी जंगल सफारीची बुकिंग केल्यानं ऐटदार आणि रुबाबदार वाघ बघण्यासाठी पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे, ऐन दिवाळीच्या दिवशी देखील या व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांची लक्षणीय गर्दी बघायला मिळाली आहे. त्यामुळे जंगल सफारी आणि व्याघ्र प्रकल्पांना अच्छे दिन आले आहेत.
ताडोबा, पेंच व्याघ्र प्रकल्पा व्यतिरिक्त इतरत्रही पर्यटकांची मोठी गर्दी
दिवाळीच्या लागोपाठ सुट्ट्या आणि हिवाळ्यातील जंगल सफारीचा उत्तम काळ यामुळे व्याघ्र प्रकल्पानां भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यामध्ये तरुणांची संख्या विशेष आहे. देशासह जगभरातील पर्यटकांना कायम आकर्षित करणारं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाशिवाय इतर नवेगाव नागझिरा, उमरेड कराडला, टिपेश्वर, बोर, इत्यादी व्याघ्र प्रकल्पांना देखील पर्यटकांनी पसंती दिली आहे. दिवाळीच्या तीन महिन्यांपासूनच पर्यटकांनी नोंदणी केल्यानं सध्याच्या घडीला व्याघ्र प्रकल्प जवळजवळ फुल झाले आहेत.
नवेगाव-नागझिरातील चोरखमारा परिसरात पर्यटकांना वाघाचं दर्शन
गोंदिया जिल्हात नवेगाव-नागझिरा हा एकमेव व्याघ्रप्रकल्प आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक हे वाघ आणि इतर प्राणी पाहण्यासाठी हौसेनं येतात. दिवाळीच्या सुट्टी निमित्त नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. पर्यटकांना सतत 4 दिवसांपासून वाघाचं दर्शन होत आहे. तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघाचं दर्शन होत असल्यानं पर्यटकांमध्ये उत्साह संचारला असून दररोज पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
भाविकांच्या गर्दीनं शेगाव नगरी फुलली
व्याघ्र प्रकल्पांसह विदर्भातील धार्मिक स्थळं देखील पर्यटकांच्या गर्दीनं बहरली आहेत. शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी स्थळाचं दर्शन घेण्यासाठी शेगावात भाविकांची तुफान गर्दी झाली असून शेगाव संस्थानच्या जवळ जवळ 2500 रूमसह शेगावातील सर्व हॉटेल्स, हाऊस फुल्ल झाल्या आहेत.