वंचित बहुजन आघाडीत फूट, भारिप बहुजन महासंघाचे माजी सरचिटणीस मिलिंद पखाले यांचा राजीनामा
वंचित बहुजन आघाडीच्या अपयशात आम्ही वाटेकरी ठरु नये, यासाठी निवडणुकीच्या निकाल लागण्याआधीच आम्ही राजीनामा दिल्याचे पखाले यांनी सांगितले.

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालपूर्वीच वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट पडली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला मदत करण्यासाठी या निवडणुकीत काम केल्याचा आरोप करत भारिप बहुजन महासंघाचे माजी सरचिटणीस मिलिंद पखाले यांनी कार्यकर्त्यांसह राजीनामा दिला आहे.
आंबेडकरी समाजाला काही वेगळे वळण मिळेल म्हणून 12 वर्षांपूर्वी भारिप बहुजन महासंघात दाखल होऊन प्रकाश आंबेडकर यांचं नेतृत्व स्वीकारलं होते. मात्र आजची भारिप केवळ सत्ता संपादनाचे खोटे स्वप्न दाखवत असल्याचा आरोप मिलिंद पखाले यांनी केला.
वंचित बहुजन आघाडीला राज्यात एकही जागा मिळणार नाही. याउलट वंचितमुळे 7 ते 8 ठिकाणी भाजपला विजय मिळण्यास मदत होईल. वंचित आघाडीच्या 99 टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल, असा दावाही मिलिंद पखाले यांनी केला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या अपयशात आम्ही वाटेकरी ठरु नये, यासाठी निवडणुकीच्या निकाल लागण्याआधीच आम्ही राजीनामा दिल्याचे पखाले यांनी सांगितले. मिलिंद पखाले यांच्यासह पूर्व विदर्भातील भारिप बहुजन महासंघाच्या सुमारे 20 जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीचा सहकारी असलेल्या एमआयएमने केवळ एकाच जाग लढवून आपला बाणा सिद्ध केला आहे. असा बाणा वंचित बहुजन आघाडीलाही दाखवता आला असता, मात्र त्यांनी तो दाखवला नाही, असं मिलिंद पखाले यांनी म्हटलं.
वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूक सर्व जागांवर लढवण्याची घोषणा केली, तेव्हापासून त्यांच्यावर टीका होत होती. वंचित बहुजन आघाडीच्या निवडणूक लढण्याचा थेट फायदा भाजपला होणार असल्याचा राजकीय विश्लेषकांचा दावा होता. तसेच वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असल्याचा आरोपही विरोधकांकडून होत होता. मात्र आता मिलिंद पखाले यांच्या राजीनाम्यानंतर या आरोपांमध्ये तथ्य आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता प्रकाश आंबेडकर यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.























