Raj Thackeray Vidarbha Tour : राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यानं मनसेला 'बूस्ट'? आज शेवटचा दिवस, सायंकाळी रेल्वेने मुंबईला होणार रवाना
Raj Thackeray Vidarbha Tour : मनसेच्या स्थापनेनंतर 16 वर्ष होऊनही विदर्भात विस्तार झाला नाही. आता राज्यातील सत्तांतरानंतर पक्ष वाढीसाठी नेतृत्वाने कंबर कसली आहे.
पक्षात तरुणांना संधी?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा खूप चांगला झाला, असे प्रवक्ते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले. या दौऱ्यात त्यांनी 18 आणि 19 सप्टेंबर, असे दोन दिवस पूर्व विदर्भातील नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि आगामी निवडणुकांसंदर्भात त्यांना मार्गदर्शन केले. जुन्या कार्यकारिणी त्यांनी बरखास्त केला आहेत आणि येत्या घटस्थापनेला नवीन कार्यकारिणीची घोषणा करू असे राज ठाकरे यांनी 18ला घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. तसेच नव्या कार्यकारिणीमध्ये तरुणांना संधी देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता. पत्रकार परिषदेनंतर ते चंद्रपूरसाठी रवाना झाले होते.
संस्था आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन मुंबईसाठी निघणार
चंद्रपूमध्ये 20 सप्टेंबरला त्यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर दुपारी चंद्रपुरातून निघून सायंकाळी ते अमरावतीला पोहोचले. तेथे त्यांचे जल्लोशात स्वागत करण्यात आले. त्यानंतर 21 सप्टेंबरला म्हणजे काल त्यांनी सकाळी गुरूकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर तळेगाव येथील क्रीडा ॲकेडमीला भेट दिली. त्यानंतर पश्चिम विदर्भाच्या अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम आणि बुलडाणा जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आज काही संस्था आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन ते मुंबईसाठी रवाना होणार आहेत.
आता ठाकरेंचा दर तीन ते चार महिन्यांत विदर्भ दौरा?
राज ठाकरे यापूर्वी 17 ऑक्टोबर 2018 ला अमरावतीला आले होते. त्यानंतर यावेळी ते पहिल्यांदाच आले आहेत. तेव्हा त्यांनी अमरावती अंबा फेस्टिवलला भेट दिली होती. या दौऱ्यात त्यांनी मेळघाटमधील अति दुर्गम चिचाटी या गावाला भेट दिली होती. त्यानंतर अमरावतीमध्ये त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन केले होते. आता दर तीन ते चार महिन्यांमध्ये ते विदर्भात दौरा करणार असल्याचे मनसे नेत्यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या