OBC Sabha : 'हो आजची उत्तर सभा, जरांगेंच्या टीकेला प्रत्युत्तर देणार'; बबनराव तायवाडे स्पष्टच बोलले
OBC Sabha : मनोज जरांगे यांच्याकडून होणारी टीका पातळी सोडून केली जात आहे. जरांगे आमची औकात काढत आहेत. आमची लायकी काढणारा जरांगे कोण? : बबनराव तायवाडे
![OBC Sabha : 'हो आजची उत्तर सभा, जरांगेंच्या टीकेला प्रत्युत्तर देणार'; बबनराव तायवाडे स्पष्टच बोलले Today Hingoli OBC Sabha is Answer Sabha Babanrao Taywade Maratha Reservation OBC Reservation OBC Sabha : 'हो आजची उत्तर सभा, जरांगेंच्या टीकेला प्रत्युत्तर देणार'; बबनराव तायवाडे स्पष्टच बोलले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/26/aadf5bd34c78dbbec6e2367bd1435bbe1700970490711737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्राचा दौरा करतांना मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आपल्या प्रत्येक सभेतून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर टीका केली. तसेच, काही ओबीसी नेत्यांनी आमचे आरक्षण दाबून ठेवल्याचे देखील आरोप केले. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज हिंगोली (Hingoli) येथे ओबीसी मेळावा (OBC Sabha) आयोजित करण्यात आला आहे. तर, या ओबीसी मेळाव्यातून मनोज जरांगे यांच्या टीकेला उत्तर दिले जाणार असल्याची माहिती ओबीसी नेते बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी दिली आहे. त्यामुळे आजची सभा उत्तर सभा असणार असल्याचे देखील तायवाडे म्हणाले आहे. त्यामुळे आजच्या सभेत कोण-कोणत्या नेत्यांकडून जरांगे यांच्यावर टीका केली जाते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मनोज जरांगे यांच्याकडून होणारी टीका पातळी सोडून केली जात आहे. जरांगे आमची औकात काढत आहेत. आमची लायकी काढणारा जरांगे कोण?, आमची लायकी आमचा अभ्यास, आमचा शिक्षण, आमचे कार्य पाहून आमचा समाज ठरवेल. जरांगे म्हणतात आम्हाला यांच्या (ओबीसी) खाली काम करावे लागेल. त्यांच्या या टीकेतून मराठे श्रेष्ठ असून ओबीसी, एससी, एसटी हे त्या लायकीचे नाही असा होतो. त्यामुळे त्यातून जातीयतेचा सुर दिसून येत आहे. जरांगेंच्या वक्तव्यामुळे ओबीसी समाज तसेच इतर मागास जातींमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांना धीर देण्यासाठी आम्ही सर्व ओबीसी नेते एकत्रित येत आहोत. त्यामुळे, आजची सभा उत्तर सभा आहे. जरांगेंच्या टीकेला उत्तर देण्यासाठी ही सभा आहे. यात सर्वपक्षीय आणि सर्व संघटनांचे ओबीसी नेते सहभागी होतील, असे बबनराव तायवाडे म्हणाले.
पहिल्या सभेत भुजबळांनी वैयक्तिक पातळीवर जाऊन काही टीका केली होती. त्यामुळे काही वेळ ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद होते. मात्र, नंतर आम्हाला लक्षात आले की, काही जणांनी भुजबळांना वैयक्तिकरित्या अत्यंत घाणेरडे आणि अश्लील भाषेतील मेसेज पाठवले होते. त्यामुळे भुजबळांचा तसा रोष होता, असेही बबनराव तायवाडे म्हणाले.
सभेला 'हे' नेते उपस्थित राहणार...
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे आदींची उपस्थित राहणार आहे. विशेष निमंत्रितनामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, नाना पटोले, जयदत्त क्षीरसागर, विनय कोरे, बबनराव तायवाडे, विजय चौगुले, प्रा. टी.पी. मुंडे, शब्बीर अहमद अन्सारी, सुनील महाराज, लक्ष्मणराव गायकवाड, मच्छिद्र भोसले, चंद्रकांत बावकर, कल्याण दळे, राजेश राठोड यांच्यासह स्थानिक नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
वडेट्टीवार अचानक हैदराबादला रवाना, हिंगोलीतल्या सभेला उपस्थित राहणार की नाही याकडे लक्ष
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)