वडेट्टीवार अचानक हैदराबादला रवाना, हिंगोलीतल्या सभेला उपस्थित राहणार की नाही याकडे लक्ष
Vijay Vadettiwar : वडेट्टीवार आज सकाळीच अचानक हैदराबादला रवाना झाल्याने, ते खरंच हिंगोलीत ओबीसी सभेत सहभागी होणार की नाही या बद्दल साशंकता निर्माण झाली आहे.
नागपूर : कधी हा कधी ना करत अखेर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आपण हिंगोली (Hingoli) येथील रविवारी होणाऱ्या ओबीसी मेळाव्यात उपस्थित राहणार असल्याचे शनिवारी जाहीर केले होते. मात्र, असे असतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज सकाळीच नागपुरातून (Nagpur) थेट हैदराबादला (Hyderabad) रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काँग्रेस पक्षाच्या कामानिमित्त ते अचानक हैदराबादला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे वडेट्टीवार आज हिंगोलीतील ओबीसी सभेत सहभागी होणार की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जालन्यातील पहिल्या सभेनंतर वडेट्टीवार यांनी भूमिकेत बदल करत आपण छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या वक्तव्याशी सहमत नसून, यापुढे त्यांच्या सभेत उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले होते. परंतु, शनिवारी त्यांनी आपली भूमिका बदलत या सभेला जाणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे, वडेट्टीवार आज सकाळीच अचानक हैदराबादला रवाना झाल्याने, ते खरंच हिंगोलीत ओबीसी सभेत सहभागी होणार की नाही या बद्दल साशंकता निर्माण झाली आहे.
मराठा समाजाबाबतची मंत्री छगन भुजबळांची वक्तव्यं दोन समाजात तेढ निर्माण करणारी आहेत. त्यामुळे, भुजबळांच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची भूमिका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली होती. त्यामुळे हिंगोली येथील ओबीसी सभेला वडेट्टीवार उपस्थित राहणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, शनिवारी मात्र त्यांनी आपली ही भूमिका बदलली. हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी सभेला भुजबळांसोबत हजेरी लावणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. गेल्या दोन दिवसांपासून हजारो ओबीसी बांधवांनी फोनवरून मला मेळाव्याला उपस्थित राहावे अशी विनंती केली, तसेच सर्व ओबीसी नेत्यांची देखील अशीच भावना आहे. त्यामुळे, उद्याच्या ओबीसी सभेला आपण उपस्थित राहणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले होते. पण, आज सकाळीच ते नागपूरहून थेट हैदराबादला रवाना झाल्याने हिंगोलीच्या सभेला ते उपस्थित राहणार की नाही हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
हिंगोलीत आज ओबीसी सभा...
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यांच्या याच मागणीला ओबीसी नेत्यांनी मात्र विरोध केला आहे. त्यामुळे राज्यभरात ओबीसी मेळावे घेण्याचा निर्णय ओबीसी बांधवांनी घेतला आहे. याची सुरुवात जालन्यातील अंबडमधून झाली. तर, अंबडमधील पहिल्या सभेनंतर आता दुसरी सभा हिंगोलीत पार पडत आहे. आजच्या या सभेला छगन भुजबळ यांच्यासह राज्यभरातील ओबीसी नेते उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे या सभेतून ओबीसी नेत्यांकडून मनोज जरांगे यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
OBC Sabha : विजय वडेट्टीवार हिंगोलीच्या ओबीसी सभेला उपस्थित राहणार, कारणही सांगितले; म्हणाले...