(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोदींना अपशब्द बोलणारे कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष अडचणीत, फसवणुकीचा गुन्हा दाखल!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव करणारे कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांची अडचण आणखी वाढली आहे. हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार प्रकरणी त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
Nagpur News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करुन अडचणीत आलेले कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांचा पाय आणखीच खोलात गेला आहे. शेख हुसेन यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मोठा ताजबाग (Tajbag) येथील हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यासह विश्वस्तांविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ट्रस्टच्या विद्यमान सचिवांनी तक्रार दाखल केली होती.
ताजुद्दीन ट्रस्टमध्ये गैरव्यव्हार
शेख हुसेन अब्दुल जब्बार (वय 68, रा. मस्कासाथ, जागनाथ बुधवारी) आणि इक्बाल इस्माईल बेलजी (वय 50, रा. साई ललिता अपार्टमेंट, राजनगर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2011 ते 31 डिसेंबर 2016 या दरम्यान शेख हुसेन हे हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टमध्ये अध्यक्ष होते. याशिवाय इक्बाल इस्माईल बेलजी हे विश्वस्त होते. यादरम्यान शेख हुसेन यांनी धर्मदाय आयुक्तांची कुठलीही परवानगी न घेता व अंकेक्षण न करता 1 कोटी 48 लाख 379 रुपये तर इक्बाल बेलजी यांनी 11 लाख 52 हजार 260 रुपये असा एकूण 1 कोटी 59 लाख 52 हजार 586 रुपये आपल्या खात्यात परस्पर वळवून घेत ट्रस्टची फसवणूक केली, अशी तक्रार ट्रस्टचे सचिव ताज अहमद अली अहमद सय्यद (वय 54, रा. निराला सोसा. मोठा ताजबाग) यांनी केली.
अद्याप अटक नाही
पोलिसांनी तक्रारीची शहानिशा करीत, शेख हुसेन यांच्यासह विश्वस्तावर गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाबाबत पोलिसांनीही कमालीचे मौन बाळगले आहे. शेख हुसेन यांना संपर्क केला असता, त्यांचा फोन बंद असल्याचे आढळले.
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आधीच अडचणीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करुन शेख हुसेन आधीच अडचणीत आले होते. कॉंग्रेस नेत्यांवर देशभरात सुरु असलेल्या ईडी आणि सीबीआय कारवाईविरोधात कॉंग्रेसने राष्ट्रीय स्तरावर (National Level Protest) आंदोलने केली. यात नागपुरातही शहर कॉंग्रेसने ईडीच्या विरोधात आंदोलन केले होते. यावेळी बोलताना कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष (Ex City President) यांची जीभ घसरली होती आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपशब्द वापरले होते.
शहरातील राजकीय वातावरण तापणार?
केंद्र सरकारतर्फे ईडीचा (ED) गैपवापर होत आहे, असा आरोप करून कॉंग्रेसने (INC) केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन (Protests Against Central Government) केले होते. त्या कार्यक्रमात शेख हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यातून भाजप आमदारांनी त्यांच्या अटकेची मागणी केली होती. आता पुन्हा एकदा अशाप्रकारे गुन्हा दाखल झाला असल्याने यातून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याचे दिसून येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या