(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News : वैद्यकीय क्षेत्रात स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे आणखी एक भक्कम पाऊल, सुसज्ज अश्या हृदयरोग चिकित्सा सेवा केंद्राचे आज लोकार्पण
Nagpur News : नागपुरातील स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. या सोहळ्याला अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.
नागपूर : स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन( Swami Vivekananda Medical Mission) हे आपल्या 50 वर्षाची अविरत आरोग्य सेवा देत यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. याच अनुषंगाने आरोग्य क्षेत्रात आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत विनामूल्य उपचार देणारे हृदयरोग चिकित्सा सेवा केंद्राचे ( Cardiology Care Center )लोकार्पण आज करण्यात येत आहे. शुक्रवारी 17 नोव्हेंबरला वर्धा मार्गावरील खापरी येथे संध्यकाळी 6 वाजता सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ( Mohan Bhagwat), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस( Devendra Fadnavis ) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.
गोठ्यापासून सुरू केलेली आरोग्यसेवा आज लाखो रुग्णांसाठी ठरली संजीवनी
'शिव भावे जीव सेवा' या उदात्त हेतूने 1974 साली एका गोठ्या पासून सुरू झालेले हा संजीवक प्रवास आज आरोग्य सेवेतील 50 वर्ष पूर्ण करीत आहे. वर्धा मार्गावरील खापरी येथे असलेल्या स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन मध्ये सध्या 100 बेड्सचे सुसंज्ज असे रुग्णालय असून 21 प्रकारच्या सुविधा या रुग्णालयात उपलब्ध आहेत. या माध्यमातून समाजातील सर्व स्तरावरील नागरिकांना विनामूल्य आवश्यक त्या सर्व आरोग्य सेवा दिल्या जातायत. आतापर्यंत जवळ जवळ 17 लाख लोकांवर या रुग्णालयच्या माध्यमातून उपचार करण्यात आलाय. अश्यातच नव्याने सुरू करण्यात येणारे हृदयरोग चिकित्सा सेवा केंद्र रुग्णांच्या उपचारासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा हेच रुग्णालयाचे 'यूएसपी'
देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूर शहरासह विदर्भ आणि लगतच्या मध्यप्रदेश, छत्तीसगड इत्यादी राज्यातील रुग्णांसाठी हे आरोग्य केंद्र मोठे वरदान ठरले आहे. वर्षाकाठी हजारांच्या संख्येने रुग्ण येथे उपचार घेत असतात. सुसज्ज आणि सर्व सेवासमावेशक अश्या या रुग्णालयाचा स्वस्त आणि गुणवत्तापूर्ण सेवा हेच 'यूएसपी' आहे. शिवाय सर्व शासकीय योजना,कार्पोरेट क्षेत्र, खाजगी विमा धारक रुग्णांवरही येथे नियमित उपचार होतात. बाल चिकित्सा,छोटी सर्जरी, सुदर्शन समदृष्टी आदी योजनांसह महात्मा फुले आणि इतरही शासकीय योजनांचा देखील लाभ येथे रुग्णांना घेता येतो. तसेच भविष्याच्या दृष्टीने पाऊले टाकत नर्सिंग कौंसिलच्या मान्यतेने नर्सिंग पदविका अभ्यासक्रमात ग्रामीण व आदिवासी भागातील 20 मुलींना प्रवेश दिला जातो. वसतिगृह, मेस, ग्रंथालय अश्या सर्व बाबींचा समावेश या ठिकाणी करण्यात आला असल्याची माहिती स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे उपाध्यक्ष पराग सराफ यांनी दिली.
12 बेड्सचे स्वातंत्र्य हार्ट सेंटर
वेळेत निदान न झाल्यामुळे आणि रुग्णालयाचे शुल्क झेपत नसल्यामुळे लाखो रुग्णांचा जीव जातो. याच अनुषंगाने नुकतेच 12 बेड्सचं हार्ट सेंटर सुरु करण्यात आले आहे. यामध्ये कार्डियाक सर्जरी शस्त्रक्रिया गृह, कॅथलॅब,आयसीसीयू, ओपीडी सेवा दिली जातेय. दरम्यान यामध्ये जवळपास 100 पेक्षा अधिक बायपासच्या शस्रक्रिया या यशस्वी करण्यात आलाय.
सुसज्ज असे मल्टिस्पेशलिस्ट रुग्णालय
कोरोना काळात सर्वत्र उपचारासाठी बेड्सचे दुर्भिक्ष जाणवत होते. अशा संकटात देखील स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनने महत्त्वाची भूमिका बजावली आणि अनेकांचे प्राण वाचवले. आगामी काळात आमचे 200 बेड चे सुसंज्ज असे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल निर्माण करण्याचा मानस आहे. त्याची पायाभरणी लवकरच होणार असून सर्वसामान्य रुग्णांसाठी हे आणखी एक मोठे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे मत पराग सराफ यांनी बोलतांना व्यक्त केले.