नागपुरातून 1200 मजुरांना घेऊन विशेष 'श्रमिक' एक्स्प्रेस उत्तर प्रदेशला रवाना
लॉकडाउनच्या काळात नागपुरात विविध सरकारी कॅम्पसमध्ये राहत असलेल्या 1200 मजुरांची वैदकीय तपासणी केल्यानंतर या ट्रेनमधून त्यांना उत्तर प्रदेशात पाठवण्यासाठी निवडण्यात आलं.
नागपूर : नागपूरमधून उत्तर प्रदेशाच्या लखनौसाठी आज संध्याकाळी एक विशेष श्रमिक एक्स्प्रेस ट्रेन रवाना झाली आहे. 24 डब्यांच्या या विशेष ट्रेनमधून सुमारे 1200 मजूर त्यांच्या गावी रवाना झाले आहे. नागपूरसह पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यातून आलेले मजूर या ट्रेनने उत्तर प्रदेशात रवाना झाले.
यावेळी नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासह विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि इतर प्रशासनिक अधिकाऱ्यांनी गावी परत जाणाऱ्या मजुरांना शुभेच्छा दिल्या आणि टाळ्या वाजवून या विशेष गाडीला रवाना केले.
लॉकडाउनच्या काळात विविध सरकारी कॅम्पसमध्ये राहत असलेल्या 1200 मजुरांची वैदकीय तपासणी केल्यानंतर या ट्रेनमधून त्यांना उत्तर प्रदेशात पाठवण्यासाठी निवडण्यात आलं होतं. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने आज संध्याकाळी या 1200 मजुरांना बसेसने रेल्वे स्टेशनजवळ आणले. तिथून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून या सर्वांना रेल्वे प्रशासनने रेल्वे स्टेशनच्या आत घेतले.
नागपुरातून सुटलेली ही विशेष ट्रेन इटारसी, झाशी, कानपूरमार्गे लखनौला जाणार आहे. मात्र मजुरांना फक्त लखनौला उतरता येणार आहे. दरम्यान या ट्रेनमधून गेलेल्या प्रवाशांकडून 505 रुपये भाडे घेण्यात आलं आहे. दरम्यान मजुरांकडून वसूल करण्यात आलेल्या भाड्याच्या मुद्द्यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी मजुरांकडून भाडे वसूल केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत मजुरांचं रेल्वेचं भाडे पीएम केयर्स फंडमधून देण्याची मागणी केली आहे.
काल म्हणजे शनिवारी 2 विशेष बसेसमधून 52 कामगार राजस्थानमधील नागौरला रवाना झाले होते. तर आज रात्रीही अनेक बसेसमधून शेकडो कामगार मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशला रवाना होणार आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती
राज्यात रविवारी कोरोनाच्या 678 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 12,974 झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दिलासादायक बाब म्हणजे आज 115 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आतापर्यंत एकूण 2115 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, आज दिवसभरात 27 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.
संबंधित बातम्या- CRPF | अधिकाऱ्याला कोरोनाची लागण, दिल्लीतलं सीआरपीएफ मुख्यालय सील
- राज्य सरकारचा मोठा निर्यय! रेड झोनमध्येही कंटेनमेंट झोन वगळता दारु विक्रीची परवानगी
- धारावीत कोरोनाचा कहर, मुंबईतल्या प्रतिधारावीत मात्र कोरोनाचे केवळ दोन रुग्ण
Coronavirus | राज्यात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 361 वर